बेळगाव शहर परिसरात आज शुक्रवारी पहाटे दाट धुंक्याबरोबरच कडाक्याची थंडी पडल्यामुळे शहर गारठून गेले होते. बेळगाव विमानतळावर आज सर्वात कमी 12.0 डिग्री सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद केली गेली.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार आता 31 जानेवारीपासून 4 फेब्रुवारी 2020 पर्यंत राज्यात कोरडे हवामान असणार आहे. राजधानी बेंगलोर येथील स्थानिक निक हवामान नुसार पहाटे थोडेफार धुके पडणार असले तरी दिवसभर आकाश स्वच्छ मोकळी असणार आहे. बेंगलोर येथील कमाल आणि किमान तापमान शुक्रवारी अनुक्रमे 32 डिग्री सेल्सिअस आणि 18 डिग्री सेल्सियस इतके नोंदविले गेले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार संपूर्ण राज्यात कोरडे हवामान असणार आहे. त्यामुळे राज्याच्या अंतर्गत भागातील विलग ठिकाणी तापमान किमान 3.1 ते 5.0 डिग्री सेल्सिअसपर्यंत घसरण्याची शक्यता आहे.
दरम्यान बेळगाव शहरात आज दिवसभर गारठा जाणवत होता. पहाटेच्या वेळी तर कडाक्याची थंडी पडली होती. थंडीबरोबरच बेळगाव शहरावर सकाळी उशिरापर्यंत धुक्याची चादर पसरली होती. परिणामी पहाटे मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांनी आज धुक्याचा आनंद पुरेपूर लुटला. थंडीमुळे शहर परिसरातील ग्रामीण भागामध्ये पहाटेपासून ठिकठिकाणी शेकोट्या पेटलेल्या दिसत होत्या.