राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार प्राप्त बेळगावच्या निखिल दयानंद जितुरी या मुलाला नवी दिल्ली येथे बुधवारी 22 जानेवारी 2020 रोजी आयोजित प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वितरण सोहळ्यास पाहुणा म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
केंद्रीय महिला व बाल कल्याण खात्यातर्फे 22 जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपस्थित राहणार आहेत. गेल्यावर्षी स्वतःचा जीव धोक्यात घालून तब्बल 150 फूट खोल विहिरीत पडलेल्या एका वर्ष-दीड वर्षाच्या बालकाचे प्राण वाचवल्याबद्दल निखिल जितुरी याला ‘ बाल शक्ती पुरस्कार देण्यात आला होता. तसेच त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ गोविंद यांच्या हस्ते त्याला ‘राष्ट्रीय बाल पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्याची संधी निखिलला मिळाली होती. याखेरीज नवी दिल्ली येथील गतवर्षीच्या प्रजासत्ताक दिन संचलनातही त्याचा सहभाग होता.
आता त्याला बुधवारी होणाऱ्या प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार वितरण सोहळ्यास खास अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. निखिल जितूरी सध्या शहरातील केएलएस सोसायटीच्या वसंतराव पोतदार पॉलिटेक्निकमध्ये शिक्षण घेत आहे.