सीमालढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या हुतात्म्यांना महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे हुतात्मा चौकात अभिवादन करण्यात आले.
भाषावार प्रांत रचनेची घोषणा झाल्यावर सीमाभाग कर्नाटकात डांबल्यामुळे सीमाभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी झालेल्या आंदोलनात बेळगाव आणि निपाणी येथे पोलिसांच्या गोळीबारात पाच जणांनी हौतात्म्य पत्करले.
निपाणी येथे कमलाबाई मोहिते, बेळगाव येथे पैलवान मारुती बेन्नाळकर आणि अन्य तिघांनी हौतात्म्य पत्करले.हुतात्मा चौकात समिती आणि शिवसेना यांच्यातर्फे हुतात्म्यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पचक्र,पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.अभिवादन केल्यावर कार्यकर्त्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून फेरी काढली.
हुतात्मा चौकातून रामदेव गल्ली,खडे बाजार, गणपत गल्ली, मारुती गल्ली,अनसुरकर गल्ली,किर्लोस्कर रोड मार्गे फिरून रॅली काढण्यात आली.दीपक दळवी,मालोजी अष्टेकर,किरण ठाकूर,सरिता पाटील,रेणू किल्लेकर,प्रकाश शिरोळकर अरविंद नागनूरी आदींनी आदरांजली वाहिली.