सीमाभागातील मराठी भाषिक आणि म. ए. समितीच्या नेते मंडळींवर बिनबुडाचे आरोप करून सीमाभागात अशांतता निर्माण करणारा कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्या भीमाशंकर पाटील याच्यावर एफआयआर नोंदवून त्याला अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी आणि कार्यकारी अध्यक्ष माजी आमदार मनोहर किणेकर यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन गुरुवारी सकाळी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. कर्नाटक नवनिर्माण सेनेचा म्होरक्या भीमाशंकर पाटील याने अलीकडेच बेळगाव येथे एक पत्रकार परिषद घेऊन सीमाभागातील मराठी भाषिक आणि म. ए. समितीच्या नेत्यांवर वाटेल ते आरोप केले आहेत. सरकारी मालमत्ता व कन्नडिगांच्या मालमत्तेचे मराठी भाषिकांनी नुकसान केले आहे या आरोपासह राकसकोप जलाशयात विष मिसळले आहे, असा आरोप भीमाशंकर यांनी केला आहे. हे आरोप बिनबुडाचे व निखालस खोटे आहेत. त्याच्या या आरोपांमुळे कर्नाटक सीमाभागातील शांतता भंग झाली आहे.
तेंव्हा यासंदर्भात सखोल चौकशी करू एफआयआर नोंदवावे आणि भीमाशंकर पाटील याला अटक करावी. तसेच सीमाभागातील मराठी भाषिकांना त्रास देण्याच्या प्रकारांना त्वरित आळा घालावा. अन्यथा आम्हाला नाईलाजाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढावा लागेल, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे, जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, मनोहर किनेकर ,आर. आय. पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर आदींसह समिती व शिवसेनेचे अन्य पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मराठी भाषिक बहुसंख्येने उपस्थित होते.