लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने नववर्षात एक अनोखा उपक्रम राबवलाय. शाळेच्या विद्यार्थ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या कामकाजाची माहिती देण्यास प्रारंभ केला आहे.
शहरातील केंद्रीय विद्यालय क्र. 2, सरदार गव्हर्मेंट पियू कॉलेज आणि वडगांव गव्हर्मेंट स्कुल नं. 14 येथील विद्यार्थ्यांनी शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या(एसीबी) पोलीस स्थानकाला भेट देऊन त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती घेतली.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचे काम कसे चालते, लाच लुचपत विरोधातील कायदा आणि लाचलुचपत प्रकरणे हाताळताना एसीबीची भूमिका याची माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने आयोजित या कार्यक्रमांमध्ये सुमारे 100 हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींचा सहभाग होता.
याप्रसंगी एसीबी पोलीस निरीक्षक व्हि.डि. कब्बूरी यांनी विद्यार्थ्यांना ‘एसीबी’बद्दल आवश्यक सर्व माहिती दिली. एसीबी उपाधिक्षक शरणाप्पा आणि पोलीस निरीक्षक वाय. एस. धरनाईक यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधून एसीबीच्या कार्यपद्धतीची माहिती दिली.
लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलीस स्थानकाला भेट देण्याचा अनुभव विद्यार्थ्यांसाठी नवा होता. यावेळी त्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे आणि शंकांचे उपस्थित अधिकाऱ्यांनी निरसन केले या कार्यक्रमात दरम्यान प्रत्येक शाळेचे दोन शिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते.