बेळगाव शहर व तालुका गटशिक्षणाधिकारी बैठकीस गैरहजर असल्याबद्दल जिल्हा पंचायत शिक्षण व स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश गोरल यांनी शुक्रवारी जिल्हा शिक्षणाधिकारी ए. बी. पुंडलिक यांना धारेवर धरले.
बेळगाव जिल्हा पंचायत शिक्षण व आरोग्य स्थायी समितीची बैठक शुक्रवारी जि. पं. सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रमेश गोरल हे होते. सदर बैठकीस बेळगाव शहर व खानापूर तालुका गटशिक्षणाधिकारी गैरहजर होते ही बाब निदर्शनास येताच गोरल यांनी जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना जाब विचारला. गटशिक्षणाधिकारीच जर बैठकीस हजर नसतील शिक्षण खात्यातील विविध समस्या कशा सोडवता येणार? आम्हाला हवी ती माहिती कशी मिळणार? असे सवाल करून रमेश गोरल यांनी जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांकडे तीव्र नाराजी व्यक्त केली.
जिल्ह्यातील शाळांची परीक्षेतील टक्केवारी वाढवण्यापेक्षा शिक्षणाचा दर्जा सुधारण्याकडे अधिक लक्ष द्या, असा सल्ला गोरल यांनी बैठकीस उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना दिला. दहावीची परीक्षा जवळ येत आहे त्यादृष्टीने व्याख्यानमाला वगैरे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक सक्षम करा, असेही रमेश गोरल म्हणाले.
बैठकीत शैक्षणिक अभ्यासक्रम, विद्यार्थ्यांचे गणवेश, वितरण बूट वितरण, शाळांच्या समस्या आदींबाबत चर्चा करण्यात आली. कांही शाळांमध्ये निकृष्ट दर्जाचे बूट विद्यार्थ्यांना दिल्याच्या तक्रारींबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. त्याचप्रमाणे गोरल यांनी नंदिहळ्ळी शाळेच्या निकृष्ट बांधकामाकडे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. निकृष्ट बांधकामामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला कोण जबाबदार असा सवालही गोरल यांनी केला. बैठकीस जि. पं. शिक्षण व आरोग्य स्थायी समितीचे सदस्य आणि शिक्षण खात्यातील अधिकारी उपस्थित होते.