बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या येत्या फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेल्या बैठकीत वॉर्ड क्र. 4 व 6 महिलांसाठी राखीव ठेवण्याचा ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सभागृहात गुरुवारी झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडियर गोविंद कलवाड हे होते. येत्या फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या निवडणुकीसाठी महिला आरक्षित वाॅर्ड निश्चित होणे बाकी होते. त्यासाठी गुरुवारी झालेल्या बैठकीस बोर्डाचे सदस्य व नागरिकांना पाचारण करण्यात आले होते. बैठकीत ब्रिगेडिअर कलवाड यांच्या हस्ते चिठ्ठी काढून 1, 3, 4 व 6 या वॉर्डांपैकी 4 व 6 क्रमांकाचा वॉर्ड महिलांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.
बैठकीस बोर्डाचे सीईओ बर्चस्वा उपाध्यक्ष विक्रम पुरोहित, सदस्य साजिद शेख, अल्लाउद्दीन किल्लेदार, डॉ. मदन डोंगरे, रिजवान बेपारी, निरंजना अष्टेकर आदींसह कॅम्प भागातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या विद्यमान सदस्यांचा कालावधी कार्यकाळ 12 फेब्रुवारी 2020 रोजी संपणार आहे त्यानंतर निवडणूक घेतली जाणार आहे. गेल्या तीन महिन्यापासून या निवडणुकीची तयारी करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील वाॅर्ड क्रमांक 4 व 6 वगळता उर्वरित चार वॉर्ड सर्वसामान्यांसाठी ठेवण्यात आले असून वार्ड क्रमांक 7 हा अनुसूचित जाती- जमातीसाठी राखीव आहे.