न्यू गांधीनगर येथील विस्थापित जय किसान भाजी मार्केटच्या समस्येवर आपण लवकरात लवकर तोडगा काढू असे आश्वासन शनिवारी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड. अनिल बेनके यांनी दिले.
किल्ला येथील कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या जागेतून हुसकावून लावलेल्या जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना अद्यापही त्यांच्या हक्काची दुकाने मिळालेली नाहीत. गांधीनगर येथे त्यांच्यासाठी उभारण्यात येत असलेल्या नव्या भाजी मार्केटच्या बांधकामाला उच्च न्यायालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. यामुळे गेल्या सुमारे दीडएक वर्षापासून संत्रस्त असलेल्या संबंधित भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी शनिवारी आमदार अनिल बेनके यांची भेट घेतली.
त्यावेळी आमदार बेनके बोलत होते. बेळगावातील भाजी मार्केटच्या समस्येमुळे संबंधित व्यापारी शेतकरी आणि किरकोळ भाजी विक्रेते हैराण झाले आहेत, याची आपल्याला जाणीव आहे. या प्रकरणात आपण आधीपासून लक्ष घालून आहोत. एकूणच जय किसान भाजी मार्केटमधील भाजीपाला व्यापारी, शेतकरी आणि लहान किरकोळ भाजी विक्रेते यांच्यावर अन्याय होऊ नये या दृष्टिकोनातून आपण प्रयत्नशील आहोत.
सध्या बेळगावात दोन्ही आयुक्त उपलब्ध आहेत. तेव्हा बुधवार नंतर या उभयतांशी चर्चा करून कोणत्याही परिस्थितीत भाजी मार्केट प्रकरणाचा निकाल लावण्याचा आपण प्रयत्न करू असे आमदार बेनके यांनी सांगितले. भाजी मार्केटमधील व्यापारी शेतकरी आणि किरकोळ भाजी विक्रेते हे सर्वजण समाधानी राहिले पाहिजे यासाठी लवकरात लवकर या समस्येवर तोडगा काढण्याची जबाबदारी माझी अशी ग्वाहीही आमदार अॅड. अनिल बेनके यांनी दिली.
याप्रसंगी उपस्थित भाजी मार्केट व्यापाऱ्यांनी आपली समस्या आणि कोर्टाची ऑर्डर याबाबत आमदार अॅड. बेनके यांना माहिती दिली. ज्याचा भाजी मार्केटशी काडीचा संबंध नाही अशा व्यक्तीने भाजी मार्केटच्या बांधकामावर न्यायालयीन स्थगितीचा आदेश मिळविला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. व्यापाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मला तोंडी काही सांगू नका, तुम्हाला मिळालेल्या उच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाची प्रत मला द्या मी स्वतः वकील असल्यामुळे आदेशाचा नीट अभ्यास करून मला पुढील कारवाई करता येईल, असेही आमदारांनी स्पष्ट केले. आमदाराशी झालेल्या बैठकीस जय किसान भाजी मार्केटच्या सर्व व्यापाऱ्यांनी गर्दी केली होती.