भुकेल्याला अन्न देणे ही भारतीय संस्कृती आहे याच संस्कृतीचे जतन करत आपल्या ‘फुड फोर नीडी’ उपक्रमांतर्गत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दररोज 150हून अधिक गरीब गरजू लोकांना मोफत भोजन देण्याचे कार्य करणाऱे बेळगावचे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र अनगोळकर यांना शहरातील महेश फाउंडेशन तर्फे ‘गिविंग स्माईल’ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
कणबर्गी येथील महेश फाउंडेशनच्या सभागृहामध्ये शनिवारी या विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभात उद्योजक सुरेंद्र अनगोळकर यांचा महेश फाउंडेशनचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना गिविंग स्माईल पुरस्कार प्रदान केला गेला. याप्रसंगी महेश फाऊंडेशनचे अन्य पदाधिकारी व शहरातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.
गेल्या दीडदोन वर्षापासून सुरेंद्र अनगोळकर हे ‘फुड फोर नीडी’ या आपल्या उपक्रमांतर्गत जिल्हा रुग्णालयातील रुग्ण तसेच त्यांच्या नातलगांसाठी मोफत भोजनाची व्यवस्था करतात. जिल्हा रुग्णालयातील डिलिव्हरी वार्ड समोर दररोज सायंकाळी 7 ते 7.45 या कालावधीत सुमारे दीडशेहून अधिक गरजू लोकांना अन्नदान केले जाते. या उपक्रमा बरोबरच सुरेंद्र अनगोळकर यांनी रुग्णालयात मयत झालेल्या गरीब लोकांचे मृतदेह त्यांच्या घरी पोचविण्यासाठी मोफत हर्षव्हॅन ची व्यवस्था केली आहे हे विशेष होय.
आता अपंगांसाठी एक रुग्णवाहिका सुरू करण्याबरोबरच ‘एज्युकेशन फोर नीडी’ हा नवा उपक्रम येत्या जानेवारी 2020पासून सुरू करण्याचा त्यांचा विचार आहे.