स्मार्ट सिटीतुन सुरू असलेली कामे अनेकांची डोकेदुखी ठरत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यवस्थापनाचा अभाव जाणुन येत आहे. त्यामुळे योग्य व्यवस्थापन नसल्याने अनेकांना याचा फटका सहन करावा लागत आहे. व्यवस्थापनाचा ठेंगा आणि उद्योजकाला फटका अशी अवस्था सध्या स्मार्ट सिटीच्या सुरू असलेल्या कामातून दिसून येत आहे.
स्मार्ट सिटीत मुख्यतः रस्त्यांना महत्व देण्यात येते. रस्त्यांचे योग्य व्यवस्थापन करणे यावरच अधिक भर देण्यात येते. मात्र या रस्ते कामामुळे बेळगावात येणाऱ्या उद्योजकांची पंचायत झाली आहे. शहरात प्रवेश करणाऱ्या अनेक रस्त्यांची कामे हाती घेण्यात आल्याने तसेच काही ठिकाणी अर्धवट पडल्याने उद्योजकांना शहरात प्रवेश करण्यास मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच अनेक रस्ते असून अडचण नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्याने योग्य व्यवस्थापन करून उद्योजकांची सोय करावी अशी मागणी होत आहे.
कर्नाटक गोवा आणि महाराष्ट्राच्या सीमेवर वसलेले बेळगाव हे उद्योजकाला चालना देणे आणि आर्थिक प्रबलता वाढविणारे ठरले आहे. मात्र मागील काही वर्षांपासून स्मार्ट सिटीची कामे हाती घेतल्यानंतर बेळगावात उद्योग व्यवसाय करण्यास अनेक जण येत नसल्याची बाब समोर आली आहे. विशेष करून गोव्यावर याचा मोठ्या प्रमाणात परिणाम होतो आहे. त्यामुळे तातडीने रस्ते काम पूर्ण केल्यास पुन्हा बेळगावला महत्त्व येणार आहे. त्यासाठी आता अधिकाऱ्यांनी हालचाली गतिमान केल्या पाहिजेत अशी मागणी होत आहे.
प्रत्येक शहराला अनेक पायाभूत सुविधांचा अभाव आहे. वातावरण शहरी असले तरी नियोजनात्मक धोरणात्मक अभावामुळे ते गलिच्छ झाले आहे. नागरिकांना अनेक सोयी-सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीची नेमकी व्याख्या हरवत चालली आहे, यात काही शंका नाही. याचा परिणाम उद्योग जगावर ही पडला आहे. उद्योगासाठी येणाऱ्या अनेक उद्योजकांनी आता बेळगाव कडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे यापुढे तरी व्यवस्थापनाचा अभाव न आणता योग्यरीत्या कामे पूर्ण करावी अशी मागणी होत आहे.