Saturday, January 4, 2025

/

शिवसेनेमुळे उंचावल्या सीमावासीयांच्या अपेक्षा

 belgaum

शिवसेना स्थापनेपासूनच मराठी भाषिकांच्या हक्कांसाठी लढत आले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून लढे दिले.मराठी माणसात स्वाभिमान निर्माण करण्याचे कार्य शिवसेनेने केले हे कोणीही नाकारू शकत नाही.व्यवसाय असो वा रोजगार शिवसेनेने नेहमी मराठी माणसाचेच हित पाहिले.महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेवेळी मुंबई गुजरातला जोडण्याचा डाव हाणून पाडला.मुंबई तुमची भांडी घासा आमची असा नारा गुजरातींनी दिला होता त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी खास आपल्या ठाकरी शैलीत त्याला प्रत्त्युत्तर दिले होते याची आठवण आजही केली जाते.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा सुरू झाला त्यावेळी शिवसेनेने त्यात झोकून दिले.

मुंबईत मोरारजी देसाई आले होते त्यावेळी त्यांच्या कारने शिवसैनिकांना चिरडले होते.शिवसेनेने संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनात एकशे पाच हुतात्मे दिले हा इतिहास आहे.पण संयुक्त महाराष्ट्राचा कलश मात्र बेळगाव,कारवार,बिदर,भालकीविनाच स्वीकारावा लागला.
शिवसेनेने पूर्वी दक्षिण भारतीयांना टार्गेट केले होते,यापूर्वी भाजप बरोबर सत्तेत असलंआल्यामुळे शिवसेना थोडी कमी आक्रमक होती,संजय राऊत यांनी तर केंद्रशासित दर्जा दयावा मागणी केले.आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यामुळे सीमावासीयांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

शिवसेना स्थापनेपासूनच सीमावसीयांच्या सोबत आहे.संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती एकशे पाच हुतात्म्यांच्या निर्मितीतून झाली.हुतात्म्यांचा त्याग जाणणारी म्हणून शिवसेनेची ओळख आहे.बाळासाहेब ठाकरे १ नोव्हेंबर १९६८ रोजी बाळासाहेब ठाकरे बेळगावला काळ्या दिनाच्या सभेत मार्गदर्शन करण्यासाठी आले होते.तेव्हापासून आजपर्यंत शिवसेनेने सिमवासीयांशी असलेली बांधिलकी जपली आहे.सीमाप्रश्न सोडवा अन्यथा मुंबईत येऊ देणार नाही असे बाळासाहेबांनी केंद्रातल्या मंत्र्यांना इशारा दिला होता.२६ जानेवारी १९६९ रोजी यशवंतराव चव्हाणांची गाडी मुंबईत शिवसैनिकांनी अडवून निदर्शने केली होती.नंतर ८ फेब्रुवारी १९६९ ला भारताचे उप पंतप्रधान मोरारजी देसाई यांची गाडी मुंबईत अडवण्याचा प्रयत्न शिवसैनिकांनी केला होता.त्यावेळी त्यांच्या गाडीने निदर्शकाना गाडीने ठोकरले होते.या घटनेचा मुंबईत उद्रेक झाला आणि ठिकठिकाणी शिवसैनिकांनी निदर्शने केली.मुंबईत जाळपोळ,दगडफेक देखील मोठ्या प्रमाणावर झाली.त्यावेळी मुंबई पेटली होती.या घटनेत गोळीबारात ६७ जणांना हौतात्म्य प्राप्त झाले होते.बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांना तुरुंगवास भोगावा लागला.मुंबई पेटल्यामुळे बाळासाहेबांना तुरुंगातून शांतता बाळगा म्हणून आवाहन करावे लागले.या आंदोलनामुळे महाजन अहवाल बाजूला पडला.

शिवसेनेच्या स्थापनेपासून आजपर्यंत १७ जानेवारीचा हुतात्मा दिन,१नोव्हेंबरचा काळा दिन सभेत शिवसेनेचे नेते बेळगावात येऊन शिवसेना सीमावसीयांच्या पाठीशी आहे याची ग्वाही देत आहेत.सीमा आंदोलनात शिवसेनेचा नेहमी प्रत्यक्ष सहभाग राहिलेला आहे.१९८६ मध्ये कर्नाटक सरकारने मराठी भाषिकांवर कन्नड सक्ती सुरू केली.या कन्नड सक्ती विरोधात कोल्हापूर येथे भव्य सीमा परिषद आयोजित करण्यात आली होती.सीमापरिषदेला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,समाजवादी नेते एस.एम.जोशी,शरद पवार यांच्यासह महाराष्ट्रातील अनेक बडे नेते सीमावसीयांना आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून दिलासा देण्यासाठी उपस्थित होती.कन्नड सक्ती विरोधात शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली मोठे आंदोलन उभे करण्याचा निर्णय सीमापरिषदेत घेण्यात आला.१जून १९८६ रोजी बेळगावात आंदोलनाला सुरुवात झाली.शरद पवार यांनी पोलिसांना चकवा देऊन कित्तूर चन्नमा चौकात आंदोलन केले.सीमावासीयांनी या आंदोलनाला मोठा प्रतिसाद दिला होता.नंतर बेळगाव तालुका,निपाणी आणि अनेक ठिकाणी कन्नड सक्ती विरोधात आंदोलन झाले.या आंदोलनात महाराष्ट्रातील सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी पक्षभेद बाजूला ठेवून सहभाग दर्शवला होता.यामध्ये शिवसेनेचा सहभाग सगळ्यात जास्त होता.आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात असलेले छगन भुजबळ,एकनाथ शिंदे यांच्यासह शेकडो शिवसैनिकांनी या आंदोलनात तुरुंगवास भोगला होता.पोलिसांनी बेळगावात येण्याचे मार्ग रोखले होते पण त्यांना चकवा देऊन महाराष्ट्रातील नेते बेळगावात येत राहिले.छगन भुजबळ यांनी वेषांतर करून मुस्लिम व्यापाऱ्याच्या वेशात बेळगावात प्रवेश करून धर्मवीर संभाजी चौक येथे आंदोलन छेडले.अटक करण्यात आलेल्या आंदोलकांना धारवाड,बेळारी,हिंडलगा आदी कारागृहात डांबण्यात आले होते.कन्नड सक्ती विरोधी आंदोलनात दहा हुतात्मे झाले.शेकडो कार्यकर्ते पोलिसांच्या गोळीबार,लाठी हल्ल्यात जखमी झाले होते.

सीमावासियावर कर्नाटक सरकारने जेव्हा जेव्हा अन्याय केला त्यावेळी महाराष्ट्रात शिवसेनेने सीमावसीयांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलने केली आहेत.कर्नाटकच्या बसना प्रवेश बंद आंदोलन तर अनेक वेळा करण्यात आले आहे.१९९६ मध्ये बेळगावच्याबतत्कालीन महापौर विजयालक्ष्मी चोपडे यांनी दिल्लीमध्ये बेमुदत उपोषण आरंभले होते.त्यावेळी शिवसेनेच्या खासदारांनी आंदोलन करून संसदेत आवाज उठवला .अखेर गृहमंत्री इंद्रजित गुप्ता यांना लोकसभेत लेखी निवेदन सादर करावे लागले.

भाजप,सेना सरकार सत्तेवर असताना चंद्रकांत दादा पाटील यांची सीमाप्रश्नाचे समन्वयक मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.पण त्यांनी केवळ एकदा भेट देऊन बैठक घेतली.नंतर मात्र त्यांनी सीमाप्रश्नाच्या दाव्याला गती देण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. वकिलांशी,सीमावासीय नेत्यांशी कधीही संवाद साधला नाही.आता शिवसेनेचा मुख्यमंत्री असल्यामुळे आणि कायम त्यांचा सीमालढ्यात प्रत्यक्ष सहभाग असल्यामुळे सीमावसीयांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.महाराष्ट्राच्या राज्यपालांनी देखील आपल्या अभिभाषणात सीमावासीयांचा उल्लेख केल्यामुळे भविष्यात सीमावसीयांना दिलासा देणारी घटना घडेल अशी आशा वाटत आहे.सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाचा दावा २००४ पासून प्रलंबित असून त्याला गती देण्यासाठी आणि निवाडा लवकर होण्यासाठी शिवसेने बरोबरच महाराष्ट्रातील साऱ्या पक्षानी हातभार लावावा अशी अपेक्षा सीमावासीयांची असल्याचे मत महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी व्यक्त केले आहे.
सहा दशकाहून अधिक काळ कर्नाटक सरकारचा अन्याय सहन करत असलेल्या सीमावसीयांना महाराष्ट्रात नेण्यासाठी आता शिवसेनेने पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.सीमाप्रश्नी कर्नाटकातील सगळ्या पक्षाचे नेते आपले मतभेद विसरून एकत्र येतात.तसे चित्र महाराष्ट्रात दिसत नाही.ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सीमाप्रश्नाविषयी आस्था आहे.उद्धव ठाकरे यांना देखील सीमवासीयांवर अन्याय झाल्याची जाणीव आहे.आता महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या शिवसेनेने पुढाकार घेऊन सर्वपक्षीयाना एकत्र आणून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राची बाजू मांडणाऱ्या वकिलांशी ,सिमवासीयांशी संवाद साधून सीमाप्रश्न लवकरात लवकर सोडवून सीमावसीयांना स्वातंत्र्या नंतरचे स्वातंत्र्य मिळवून द्यावे एव्हढीच त्यांची अपेक्षा आहे.

विलास अध्यापक,(महााराष्ट्र टाईम्स)बेळगाव

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.