हनी ट्रॅप करून दरोडा घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या एक अल्पवयीन मुलगा व दोन महिलांसह पाच जणांच्या टोळीला माळ मारुती पोलिसांनी गजाआड केले आहे.गेल्या पंधरवड्यात बेळगाव पोलिसांनी हनी ट्रॅप मध्ये गुंतलेल्या दुसऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.
पोलिसांनी आलिशान शहाबुद्दीन सय्यद रा.काकर स्ट्रीट कॅम्प,अखिल अल्लाबक्ष बेपारी रा.काकर स्ट्रीट कॅम्प,सलमान गुलाज बेग रा.जाफर स्ट्रीट कॅम्प, श्रीमती बीबी आयेशा अब्दुल सतार शेख रा. महंतेशनगर,हीना अखसर सावनूर रा.रूक्मिणी नगर बेळगाव यांना अटक केली आहे.
वीरभद्र नगरचे एम एम मुजावर हे कपड्याचे व्यापारी असून ते महंतेशनगर स्टेट बँकेत आपल्या व्यवहारासाठी गेले ते बँकेतून बाहेर पडताच बीबी आयेशा आणि हिना या दोन महिलांनी त्यांना तुमचे द्यायचे पैसे घरात ठेवले आहेत घरीच चला घरी तुम्हाला पैसे देतो असे सांगितले. त्यांच्या समवेत पैसे आणण्यासाठी मुजावर त्यांच्या घरी गेले होते यावेळी घरात अगोदरच चार व्यक्ती तयारीत होत्या.मुजावर यांना बळजबरीने घरातील चार व्यक्तींनी नग्न करून त्यांच्या जवळ असलेले 16 हजार 500 रुपये आणि हातातील घड्याळ काढून घेतले नंतर नग्नावस्थेतील मुजावर यांचा व्हीडिओ काढून आम्हाला पाच लाख रुपये दे नाहीतर तुझ्यावर बलात्काराची केस घालतो सोशल मीडियावर नग्न व्हीडिओ व्हायरल करतो अशी धमकी दिली.
या एकंदर प्रकाराने घाबरलेल्या मुजावर यांनी मी आता अडीच लाख रुपये बँकेतून काढून आणतो व तुम्हाला देतो असें सांगून तेथून कशी बशी सुटका करून घेतली.बाहेर पडताच मुजावर यांनी माळ मारुती पोलीस स्टेशन गाठून घडल्या प्रकारा बद्दल तक्रार दाखल केली.ही घटना माळ मारुती पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक बी आर गड्डेकर यांनी ए सी पी नारायण भरमनी यांना कळवली.त्यांच्या नेतृत्वाखाली धाड घालून सगळ्यांना अटक करण्यात आली.आरोपीं कडून 16 हजार 500 रोख रक्कम घड्याळ व्हीडिओ काढण्यासाठी वापरलेले मोबाईल तीन दुचाकी जप्त करण्यात आल्या.
माळ मारुती पोलिसांनी तत्परतेने तपास करत हनी ट्रॅप मध्ये गुंतलेल्याना अटक केल्या बद्दल पोलीस आयुक्त लोकेशकुमार यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.