Friday, April 26, 2024

/

या गावात मुलीही लग्न करून द्यायला तयार नाहीत-कचरा डेपो हलवा

 belgaum

तुरमुरी (ता. बेळगाव) येथील कचरा डेपो लवकरात लवकर इतरत्र हलवावाच शिवाय सध्या येथे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्यामध्ये वाढ करण्यात येऊ नये, अशा मागणीचे निवेदन मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांसह विभागीय आयुक्त आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला सादर करण्यात आले.
तुरमुरी ग्रामस्थांनी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, जि. पं. सदस्य सरस्वती पाटील व ता.पं. सदस्य शुभांगी राजगोळकर यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले .

जिल्हाधिकाऱ्यांच्या सहायकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. तुरमुरी येथील कचरा डेपो पूर्वी प्रारंभी फक्त 140 टन कचरा टाकला जात होता त्यानंतर त्यात वाढ होत गेली. आता याठिकाणी तब्बल 450 टन कचरा टाकण्याचा घाट घातला जात आहे. त्यामुळे तुरमुरीवासियांच्या आरोग्यावर घाला पडणार आहे. याची गांभीर्याने दखल घेऊन तुरमुरी कचरा डेपोत इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याची परवानगी देऊ नये, तसेच हा कचरा डेपो त्वरित इतरत्र हलवावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.

Turmuri
Turmuri

निवेदन सादर करते वेळी तुरमुरी ग्रा. पं. अध्यक्ष रामू शेट्टू खांडेकर, माजी ग्रा. पं. अध्यक्ष नागराज जाधव लक्ष्मण पाटील, लक्ष्मण जाधव, मल्लाप्पा गंगानगर, मारुती लक्ष्मण खाडे आदी उपस्थित होते.
तुरमुरी (ता.बेळगाव) येथील वादग्रस्त कचरा डेपोचा प्रश्न अद्यापि भिजत पडला आहे. गेल्या 14 वर्षापासून या कचरा डेपोमुळे तुरमुरी ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या कचरा डेपोमध्ये प्रारंभी 140 टन कचरा टाकण्याचा निर्णय तुरमुरीकरांच्या संमतीने घेण्यात आला होता.

 belgaum

मात्र कालांतराने त्यात वाढ होऊन तो 250 ते 300 इतका झाला. डोंगरावर उंच जागी असणाऱ्या या कचरा डेपोमध्ये बेळगाव शहर आणि परिसरातील कचरा टाकला जातो. शिवाय कत्तलखान्यातील मृत जनावरांचे अवशेष व मृत जनावरेही फेकली जातात. त्यामुळे तुरमुरी परिसरात प्रचंड दुर्गंधीचे वातावरण पसरलेले असते. परिणामी ग्रामस्थांच्या विशेषकरून लहान मुलांच्या आरोग्यास धोका निर्माण तर झालाच आहे शिवाय आता तर या गावांमध्ये लग्नासाठी कोणी मुलीही द्यायला तयार नाहीत, असे माजी ग्रामपंचायत चेअरमन नागराज जाधव यांनी याप्रसंगी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.