नंदिहळ्ळी (ता. बेळगाव) परिसरात गेल्या महिन्याभरापासून नव्या रेल्वेमार्गाच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या सर्वेक्षणाच्या विरोधात नंदिहळ्ळी परिसरातील शेतकऱ्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांना नुकतेच निवेदन सादर केले.
भारतीय रेल्वे खात्यातर्फे देसुर ते बागलकोट असा नवीन रेल्वे मार्ग बांधण्यात येणार आहे. यासाठी गेल्या महिन्याभरापासून सर्वेक्षण( सर्व्हे) हाती घेण्यात आले आहे. मात्र ज्या जमिनीतून हा रेल्वेमार्ग जाणार आहे ती शेतजमीन सुपीक व पिकाऊ असल्याने शेतकरीवर्ग घाबरला असून त्यांनी या रेल्वे सर्वेक्षणास तीव्र विरोध केला आहे.
त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी नंदीहळळी येथे सुरू असलेले रेल्वेमार्ग सर्वेक्षणाचे काम संतप्त शेतकऱ्यांनी बंद पाडले होते. सध्याच्या सर्वेक्षणानुसार रेल्वेमार्ग झाल्यास बेळगाव तालुक्यातील नंदिहळळीसह राजहंसगड, अंकलगी, नागेनहटटी व देसूर या गावातील शेतकऱ्यांच्या शेतजमिनींचे मोठे नुकसान होणार आहे. नंदिहळळीसह राजहंसगड, अंकलगी, नागेनहटटी व देसूर या भागातील शेतजमीन सुपीक आहे.
या जमिनीत दरवर्षी ऊस, रताळी, बटाटे, भात आणि भाजीपाल्याचे पीक घेतले जाते. या जमिनी उपरोक्त गावातील शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन आहेत. तेंव्हा जर या जमिनी रेल्वेमार्गासाठी वापरण्यात आल्यास संबंधित शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. तसेच त्यांच्यावर उपासमारीची पाळी येणार आहे. या संभाव्य संकटामुळे येथील शेतकरी भयभीत झाला असून त्यांनी या रेल्वे मार्ग सर्वेक्षणास तीव्र विरोध दर्शविला आहे.
याच अनुषंगाने नंदिहळळी, राजहंसगड, अंकलगी, नागेनहट्टी, देसुर या बेळगाव तालुक्यातील गावांमधील शेतकऱ्यांनी नियोजित रेल्वेमार्ग सर्वेक्षणाच्या विरोधात केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांना निवेदन दिले. गेल्या पंधरा दिवसांपासून नियोजित रेल्वेमार्गासाठी देसुर, नंदिहळळी आदी परिसरातील शेत जमिनीमध्ये जे सर्वेक्षणाचे काम सुरू आहे त्याला आमचा विरोध आहे. संबंधित शेतजमिनी या राजहंसगड, अंकलगी, नागेनहटटी, नंदिहळळी व देसूर गावातील बहुसंख्य शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे साधन आहेत. या सुपीक जमिनीत विविध पिके वर्षातून दोन वेळा घेतली जातात, शिवाय या ठिकाणी घरे, कूपनलिका आणि खुल्या विहिरी आहेत.
हे सर्वकांही रेल्वे मार्गामुळे नष्ट होणार आहे. शिवाय बाराही महिने पाणी असणाऱ्या येथील नाल्याचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. तेंव्हा सदर पिकाऊ शेतजमिनी ऐवजी लगत असणाऱ्या पडीक जमिनीचा वापर रेल्वेमार्ग उभारण्यासाठी करावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी राजहंसगड, अंकलगी, नागेनहटटी, नंदिहळळी व देसूर गावातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.