समितीने नेत्यांना गोळ्या घाला असे सरकारला सांगणार्या महाशयांना मी ओळखत नाही, त्यांना जास्त महत्त्व देऊ नका असा टोला हाणून म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक प्रा. एन. डी. पाटील यांनी कर्नाटक नवनिर्माण सेनेचे म्होरके भीमाशंकर यांना त्यांची जागा दाखवून दिली.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्या संदर्भात केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांनी देशद्रोह्यांना गोळ्या घाला असे विधान केले. त्याचा संदर्भ घेऊन कर्नाटक नवनिर्माण सेनेचे भीमाशंकर यांनी ‘तसे असेल तर समितीने त्यांनाही गोळ्या घाला’ असे प्रक्षोभक वक्तव्य केले आहे.
यासंदर्भात कोल्हापूर मुक्कामी प्रसारमाध्यमांशी बोलताना सीमा लढ्यातील म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक प्रा. एन. डी. पाटील यांनी समिती नेत्यांना त्यांना गोळ्या घाला असे सरकारला सांगणारे हे महाशय कोण हे मला माहीत नाही. मी गेल्या साठ-पासष्ट वर्षापासून सीमा चळवळीत काम करत आहे. यादरम्यान मी महाराष्ट्र व कर्नाटकातील नेत्यांना आतून बाहेरून पाहिले आहे.
जेंव्हा लढा सुरू झाला तेव्हा आमच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी बेधडकपणे या लढ्यात उड्या घेतल्या. लोकशाहीच्या मार्गाने सुमारे सहाहून अधिक दशकं हा लढा सुरू आहे. हा लढा जिवंत ठेवण्यात म. ए. समितीसह समस्त सीमावासीयांचे मोठे योगदान आहे. तेंव्हा भीमाशंकर सारख्यांना जास्त महत्त्व देऊ नये, असे प्रा. एन. डी. पाटील म्हणाले