कडोली येथील चिमुरड्या बालिकेवरील अत्याचाराच्या घटनेमुळे कडोलीसह संपूर्ण बेळगाव जिल्हा हादरला आहे. कडोली गावच्या नैतिक परंपरेला काळिमा फासणाऱ्या या अत्याचाराच्या घटनेतील नराधमास फाशीची शिक्षा व्हावी या मागणीसाठी समस्त संतप्त कडोलीकर आपली सर्व कामे थांबून शुक्रवारी रस्त्यावर उतरले. या सर्वांनी विराट धडक मोर्चाद्वारे जिल्हाधिकारी आणि जिल्हा रुग्णालय प्रशासनाला निवेदन सादर केले.
शुक्रवारी सकाळी संतप्त कडोलीवासियांचा भव्य मोर्चा प्रथम जिल्हा रुग्णालय आणि बीम्स येथे गेला. तेंव्हा हजारोच्या संख्येने मोर्चाने आलेल्या कडोलीकरांना पाहून जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे धाबे दणाणले. रुग्णालयाचे मुख्य अधिकारी अर्थात जिल्हा मुख्य शल्यचिकित्सकांनी बाहेर येऊन मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घ्यावे यासाठी मोर्चेकरी महिला व ग्रामस्थांनी जिल्हा रुग्णालयाच्या आवारातच ठाण मांडले.
अखेर मुख्य जिल्हा शल्य चिकित्सक नसल्याने प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सकांनी मोर्चेकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी गुरुवारपासून कडोली येथील बलात्काराच्या घटनेचा पाठपुरावा करणाऱ्या राष्ट्रीय महिला फेडरेशनच्या राज्य सचिव प्रमोदा हजारे यांनी यावेळी आपले विचार मांडताना आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी करून जिल्हा रुग्णालयांमध्ये पीडित मुलीचे योग्य ती काळजी घेतली गेली नाही, तिची चौकशी आणि वैद्यकीय तपासणी भयमुक्त वातावरणात करण्यात आलेली नाही असे सांगून निर्भया कक्ष 24 तास कार्यरत राहिला पाहिजे असे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हा रुग्णालय प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर कडोलीवासियांच्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केली. सदर मोर्चामध्ये महिला आणि युवतींचा मोठा सहभाग होता. महिलांनो जागे व्हा, मुलींनो शूर व्हा, पीडित मुलीला न्याय मिळालाच पाहिजे, नराधमाला फाशी झालीच पाहिजे अशा जोरदार घोषणा देत निघालेल्या या मोर्चाच्या अग्रभागी महिला व युवती होत्या.
जिल्हा रुग्णालय येथून चन्नम्मा सर्कल मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला त्याठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. याठिकाणी जिल्हा प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बोलताना जि. पं. सदस्य सरस्वती पाटील म्हणाल्या की, संपूर्ण बेळगाव तालुका कडोलीतील घटनेचा धिक्कार करत आहे आता आम्ही गप्प बसणार नाही. प्रशासनाने खडबडून जागे व्हावे ते तसेच या प्रकरणाचा लवकरात लवकर निकाल लावण्यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणीही पाटील यांनी केली. येत्या सोमवार पर्यंत या घटनेतील पीडितेला न्याय मिळाला नाहीतर पुन्हा आंदोलन छेडले जाईल असा इशारा दिला.
प्रमोदा हजारे यांनी देश की बेटी भीक नही मांगती अपना हक मांगती है असे सांगून पीडितेची वैद्यकीय तपासणी, पोलीस तपास हे सर्व योग्य तऱ्हेने होणे आवश्यक आहे असे स्पष्ट करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवून लवकरात लवकर निकाल लावावा अशी मागणीही केली.
यापूर्वी बेळगावातील सामूहिक अत्याचाराच्या घटनेत बळी पडलेल्या कै. शितल चौगुले हिचा भाऊ विनायक देसाई यानेही यालाही ही शुक्रवारी आपल्या भावना आवरता आल्या नाहीत. उपस्थित जनसमुदायासमोर त्याने बोलताना त्याने फाशी दिल्याने गुन्हेगाराला एकदाच शासन मिळते, त्यापेक्षा अशा नराधमांना अपंग करून रस्त्यावर टाकले पाहिजे असे परखड मत व्यक्त केले. संयम बाळगणे ठीक आहे पण तो किती काळ बाळगायचा असा सवालही त्यांने केला.
याप्रसंगी युवानेते भाऊ गडकरी, उदय सिद्दणावर, उदय होनगेकर, अरुण पाटील संभाजी होनगेकर आदींसह हजारो महिला व पुरुष उपस्थित होते. मोर्चादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.