गेल्या काही दिवसांपासून शहापूर परिसरात काळ्या तोंडाच्या माकडांच्या टोळीने हैदोस घातला आहे. सदर माकडे मालमत्तेचे नुकसान करण्याबरोबरच लहान मुले व नागरिकांच्या अंगावर धावून जात असल्याने त्यांचा त्वरित बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
गेल्या काही दिवसांपासून काळ्या तोंडाच्या माकडांच्या टोळीने शहापूर आणि हिंदवाडी भागात आपल्या उपद्रवी माकड चेष्टांनी उच्छाद मांडला आहे. येथील घरे आणि बंगल्यांच्या आवारातील बगिच्यात असलेल्या झाडांवर मुक्काम ठोकणारे ही माकडे बंगल्याचे पाईप आणि सोलार हीटर्सचे नुकसान करत आहेत परिणामी इमारत मालकाला मोठा आर्थिक फटका बसत आहे.
सदर 10 ते 15 माकडांच्या टोळीने जेड गल्ली शहापूर परिसरात तर दहशत निर्माण केली आहे. येथील 10 ते 12 वर्षाच्या दोन मुलांसह एका महिलेच्या अंगावर ही माकडे धावून गेल्याचा प्रकार नुकताच घडला. माकडांचा हल्ला झालेल्या महिलेचे नाव पार्वती होरटी असे असून तिला सुदैवाने कोणतीही इजा झाली नाही. घराच्या परसात नेहमीप्रमाणे पार्वती आपले दैनंदिन काम करत असताना अचानक एका काळ्या तोंडाच्या मोठ्या हुप्प्या माकडाने तिच्यासमोर उडी घेतली, तसेच दात विचकावून भितीदायक आवाज काढण्यास सुरुवात केली.
![Monkey shahapur](https://belgaumlive.com/wp-content/uploads/2019/12/IMG-20191218-WA0288.jpg)
तेंव्हा पार्वतीने मदतीसाठी आरडाओरड करताच घरात असलेला तिचा पती परसात धावून आला. दरम्यान आणखी काही माकडे पार्वतीच्या आसपास पोहोचली होती. तेंव्हा प्रसंगावधान राखून पार्वतीचा पती संतोषाने जवळ पडलेली एक काठी उचलून माकडांना पळवून लावले. या उपद्रवी माकडांनी जेड गल्लीतील मंदार हुबळी यांच्या घरामागील बगीच्यातील झाडांची नासधूस केली. तेव्हा मंदार यांनी फटाके फोडून त्यांना पळवून लावले.
मारुती कारेकर यांच्या बंगल्याच्या टेरेसवरील पाईपलाईन आणि सोलर हिटरच्या कनेक्शनची माकडांनी मोडतोड केली आहे कार्यकर्त्यांच्या घरातील लोकांनी लाठ्या-काठ्या घेऊन टेरेसवर धाव घेताच माकडांची टोळी पसार झाली. त्यानंतर फुटलेल्या पाईपलाइन मधील पाणी गळती थांबविता ना घरातील लोकांची पुरेवाट झाली.
तेंव्हा महापालिकेसह वनखात्याने याची गंभीर दखल घेऊन संबंधित माकडांच्या टोळीचा त्वरित बंदोबस्त करावा अशी जोरदार मागणी शहापूर परिसरातील नागरिकांकडून होत आहे.