बेळगावच्या गजाननराव भातकांडे शाळेची सहल अलीकडेच महाबळेश्वर येथे गेली असता शिक्षिकेच्या हातातील एक लाख रुपये असणारी पर्स माकडाने खोल दरीत पळवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मात्र श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील ट्रेकर्सनी खोल एलफिस्टन दरीतून ते पैसे परत मिळवून दिल्याने भातकांडे शाळेच्या शिक्षकांचा जीव भांड्यात पडला.
याबाबतची अधिक माहिती अशी की, बेळगावच्या गजाननराव भातकांडे हायस्कूलची सहल महाबळेश्वर येथे पर्यटनासाठी गेली होती.
श्रीक्षेत्र महाबळेश्वर येथील आर्थर सीट पॉईंट पाहिल्यावर सहल एलीफिस्टन पॉईंट येथे आली. त्याठिकाणी सर्वजण पर्यटनाचा आनंद लुटत असताना एका शिक्षिकेच्या हातातील एक लाख रुपये रोकड असणारी पर्स एका माकडाने नजीकच्या खोल एलफिस्टन दरीत पळवून नेली. अचानक हा प्रकार घडल्याने संबंधित शिक्षिका घाबरल्या आणि पर्समध्ये एक लाखाची रोकड असल्याने गर्भगळीत झाल्या. माकडाच्या ताब्यातील पर्स मिळवण्यासाठी सर्वांनी धावपळ केली परंतु ते माकड पर्स घेऊन शिताफीने खोल दरीत गायब झाले. पर्समध्ये विद्यार्थ्यांचे सहलीचे एक लाख रुपये असल्याने हबकलेल्या शिक्षिका रडू लागल्या.
सदर प्रकाराची माहिती महाबळेश्वर येथील ट्रॅक्टर्स जयवंत बिरामणे व अनिल लांगी यांना मिळताच ते दोघे सायंकाळी सहा वाजता घटनास्थळी दाखल झाले. लागलीच मदत कार्य हाती घेताना आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने हे दोघे ट्रेकर्स 80 ते 100 फूट खोल दरीत उतरले. खाली पोहोचल्यावर त्यांना प्रारंभी 500 आणि 100 रुपयांच्या नोटांचे प्रत्येकी एक बंडल सापडले. त्यानंतर अंधार पडल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी हे ट्रेकर्स पुन्हा दरीत उतरले, अगदी खोल दरीत गेल्यावर त्यांना दोन हजार रुपयांच्या नोटांचा बंडल सापडला.
सहलीला गेलेल्या गजाननराव भातकांडे हायस्कूलचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे तसेच विद्यार्थी व शिक्षक आनंद वन भुवन येथे विसावले होते. बिरामणे व लांगी या ट्रेकर्सनी मिलिंद भातकांडे यांच्याशी संपर्क साधून सापडलेली 1 लाख रुपयांची रक्कम त्यांच्या ताब्यात दिली. दरम्यानच्या काळात भातकांडे शाळेच्या शिक्षक वर्गाच्या तोंडचे पाणी पळाले होते. अखेर पैसे परत मिळाल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. मिलिंद भातकांडे यांच्यासह संबंधित शिक्षकांनी महाबळेश्वरच्या धाडसी बिरामणे व लागी तसेच त्यांच्या सहकारी ट्रेकर्सचे आभार मानले. उपरोक्त घटनेनंतर श्रीक्षेत्र महाबळेश्वर परिसरात जयवंत बिरामणे, अनील लांगी व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक होत आहे.