जगात काही मोजकेच लोक असे असतात की ज्यांना अचाट स्मरणशक्तीचे वरदान लाभलेले असते. स्मरणशक्तीही मानवाला मिळालेली ईश्वरी देणगी असली तरी तिचे जतन व संवर्धन करणे सर्वांनाच जमत नाही. मात्र हेमंत जोशी याला अपवाद आहेत, हेमंत यांनी आपली स्मरणशक्ती नुकतीच आंतरराष्ट्रीयस्तरावर सिद्ध करून वर्ल्ड मेमरी चॅम्पियन हा किताब हस्तगत केला आहे.
मूळचे बेळगावचे सुपुत्र असणारे हेमंत जोशी सध्या बहारीन येथे नॅस कंपनीत कार्यरत असून आपल्या अफाट स्मरणशक्तीसाठी ते सुपरिचित आहेत. चीनमधील जोहाई येथे गेल्या 29 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान झालेल्या आंतरराष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धेत हेमंत जोशी यांनी वर्ल्ड मेमरी चॅम्पियन हा सर्वोच्च किताब पटकावला आहे.
इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ मेमरी अर्थात आंतरराष्ट्रीय स्मरणशक्ती संघटनेतर्फे आयोजित या स्पर्धेत जगभरातून आलेल्या प्रखर स्मरणशक्ती प्राप्त स्पर्धकांचा सहभाग होता. या अनोख्या स्पर्धेतील विविध चाचण्यांमध्ये सर्वाधिक गुण संपादन करत हेमंत यांनी वर्ल्ड मेमरी चॅम्पियन किताब मिळविला.
यापूर्वी ऑस्ट्रिया येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्मरणशक्ती स्पर्धेतही त्यांनी अग्रस्थान मिळवले होते. त्यावेळी सदर स्पर्धेत हेमंत जोशी यांनी सर्वाधिक 1800 गुण संपादन केले होते.