टिळकवाडीतील कलामंदिर आवारातील नियोजित मॉलच्या पाया खोदाईप्रसंगी अवघ्या 6 ते 8 फुटावर पाणी लागल्याने परिसरातील विहिरींचे भवितव्य धोक्यात आले आहे.
टिळकवाडीतील कलामंदिर येथे महापालिकेकडून मोलची उभारणी करण्यात येणार आहे. सध्या या नियोजित माॅलच्या पाया खोदाईचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना अवघ्या 6 ते 8 फुटावर पाणी लागले आहे. जमिनीत मोठ्या प्रमाणात पाणी लागल्याने प्रति मिनिट 3000 लिटर पाणी उपसा करणाऱ्या उच्च क्षमतेच्या पंपाद्वारे हे पाणी उपसले जात आहे.
मॉलच्या मजबूत पायासाठी हे पाणी उपसणे गरजेचे असले तरी याचा विपरीत परिणाम आसपासच्या विहीरीवर होणार आहे. पाणी उपशाचा एकंदर वेग पाहता कलामंदिर परिसरातील विहिरींमध्ये लवकरच पाण्याचा दुष्काळ पडणार आहे.
मॉल बांधकामासाठीच्या पाणी उपशामुळे या परिसरातील विहिरींचीच नाही तर जमिनीखालील नैसर्गिक पाण्याची पातळीही झपाट्याने खालावणार असल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. त्याचप्रमाणे यावर योग्य तो तोडगा काढण्याची मागणीही केली जात आहे.