शहरातील पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग नजीकच्या प्रस्थापित जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांची पर्यायी जागेची समस्या येत्या 15 दिवसात सोडविली नाहीतर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. जय किसान व्हेजिटेबल मार्केट व्यापारी संघटनेच्या गुरुवारी सकाळी महामार्गाशेजारील प्रस्थापित भाजी मार्केट परिसरात झालेल्या बैठकीप्रसंगी संतप्त भाजी व्यापाऱ्यांनी हा इशारा दिला.
सहा महिन्यापूर्वी जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना भुईकोट किल्ल्या शेजारील जागा रिकामी करून एपीएमसी मार्केट यार्डातील दुकान गाळ्यांमध्ये स्थलांतरित होण्याची सक्ती करण्यात आली होती. कॅन्टोन्मेंट बोर्डाला एका प्रकल्पासाठी किल्ल्याजवळील ती जागा हवी असल्याने भाजी मार्केटला तेथून हटविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि व्यवसायावर विपरीत परिणाम होणार असल्याने जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांचा एपीएमसी भाजी मार्केटमध्ये स्थलांतर करण्यास विरोध होता. कॅन्टोन्मेंटच्या जागेतून एपीएमसीमध्ये स्थलांतरित करताना जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना सहा महिन्यात त्यांच्या मालकीचे दुकान गाळे देण्याचे आश्वासन देण्यात आले होते तथापि येत्या 14 तारखेला सहा महिने पूर्ण होत असली तरी अद्यापपर्यंत जय किसान भाजी मार्केटमधील 230 दुकानदार पैकी 200 दुकानदारांना अद्यापही हक्काची दुकाने मिळालेली नाहीत. याबाबत संबंधित व्यापाऱ्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून देखील प्रशासनाने त्यांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. परिणामी सध्या संबंधित दुकानदारांची त्रिशंकू अवस्था झाली आहे.यासंदर्भात आज आज गुरुवारी सकाळी झालेल्या बैठकीत सांगोपांग चर्चा होऊन येत्या पंधरा दिवसात जय किसान भाजी मार्केट मधील अन्यायग्रस्त व्यापाऱ्यांची पर्यायी दुकान सगळ्यांची समस्या न सोडविल्यास तीव्र आंदोलन हाती घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
बेळगावात पूर्वी किल्ल्याजवळ जे भाजी मार्केट होते त्यामुळे बेळगावसह परगावातील शेतकरी तसेच बेळगाव शहर आणि परिसरातील ग्राहकांची चांगली सोय होत होती. त्यानंतर जय किसान भाजी मार्केट पुण्या पूना बेंगलोर महामार्गाशेजारील जागेत हलविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार संबंधित ठिकाणी भाजी मार्केट दुकान गाळयाच्या उभारणीचे कामही सुरू झाले, मात्र माशी कोठे शिंकली कळाले नाही. या जागेबाबत वाद निर्माण होऊन हा वाद न्यायप्रविष्ट झाला. परिणामी नियोजित भाजी मार्केट उभारण्याचे काम अर्ध्यावर धूळखात पडून राहिले आहे.
त्यामुळे त्यावेळी जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना एपीएमसी मार्केट यार्डमध्ये उभारण्यात आलेल्या आधुनिक भाजी मार्केटमध्ये स्थलांतरित होण्याची सक्ती करण्यात आली. मात्र त्याठिकाणी लिलावानंतर शिल्लक राहिलेले 30 गाळे जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांना देण्यात आले. सहा महिन्यात तुम्हाला तुमची हक्काची दुकाने मिळतील तोपर्यंत या ठिकाणी भाडे भरून राहा असे त्यांना सांगण्यात आले. मात्र आता सहा महिने उलटत आले तरी कोणतीही हालचाल झालेली नाही. एपीएमसी मार्केट यार्ड स्थलांतरीत झाल्यानंतर संबंधित व्यापाऱ्यांच्या व्यवसायावर अनिष्ट परिणाम तर झालाच आहे. शिवाय किती दिवस भरमसाठ भाडे भरून एपीएमसी मध्ये राहायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरम्यान उर्वरित 200 व्यापारी तर अद्यापही वाऱ्यावरच आहेत. यासाठी बेळगावामध्ये एपीएमसी मार्केट यार्डातील आणि दुसरे महामार्ग शेजारील न्यू गांधीनगर येथील प्रस्तापित भाजी मार्केट अशी दोन भाजी मार्केट सुरू करावीत, अशी जोरदार मागणी जय किसान भाजी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी तसेच उपस्थित असलेल्या बेळगाव आणि परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.
पूना बेंगलोर महामार्ग शेजारील न्यू गांधी नगर येथील प्रस्थापित जागेत जय किसान भाजी मार्केटला परवानगी दिल्यास व्यापाऱ्यांचीच नव्हे तर शेतकरी आणि ग्राहकांची चांगली सोय होणार आहे. ह्या भाजी मार्केटच्या स्थलांतरामुळे संबंधित व्यापाऱ्यांवरच नाही तर शेतकऱ्यांवरही अन्याय झाला आहे. पूर्वी बेळगावसह बागेवाडी, गोकाक आदी भागासह चक्क कित्तूर- धारवाडपर्यंतच्या शेतकऱ्यांचा माल जय किसान भाजी मार्केटमध्ये येत होता. मात्र आता परगावच्या शेतकऱ्यांना खास गाड्यांची सोय करून एपीएमसीला जावे लागत आहे. त्यामुळे त्यांना अवाच्यासव्वा भाड्याचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.
बेळगाव शहरातील किरकोळ व्यापारीही याला अपवाद नाहीत. त्यांना एपीएमसीमधून दोन-चार डागण्यासाठी 200 ते 300 रुपये रिक्षा भाडे द्यावे लागत आहे. हे परवडणारे नसल्यामुळे गरीब किरकोळ भाजी विक्रेत्यांवर पर्यायाने त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे. याला बेळगावची राजकीय यंत्रणा व पोलिस खाते जबाबदार असल्याचा आरोप मोहन मनोळकर यांनी बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. जय किसान भाजी मार्केट व्यापारी संघटनेच्या गुरुवारी झालेल्या बैठकीस मार्केटमधील सर्वच्या सर्व 230 व्यापारी तसेच परिसरातील शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते.