हैदराबाद येथील डॉक्टर प्रियांका रेड्डी बलात्कार व खून प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी ज्या पद्धतीने एन्काऊंटर मध्ये यमसदनी पाठविले त्याचे नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन कर्नाटक राज्य शाखेने एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे समर्थन करून पाठिंबा दर्शविला आहे.
डॉक्टर प्रियांका रेडी सामूहिक बलात्कार व खून प्रकरणातील चारही आरोपींना हैदराबाद पोलिसांनी एन्काऊंटर मध्ये ठार करून योग्य ती शिक्षा दिली आहे. यामुळे डॉक्टर प्रियांका यांच्या आत्म्यास शांती लाभली असून बलात्कार पीडित महिलांना दिलासा मिळाला आहे.
हैदराबाद पोलिसांच्या या झटपट कृतीला एन एफ आय डब्ल्यू चा सलाम देशातील अन्य राज्यातील पोलिसांनीही हैदराबाद पोलिसांचा आदर्श घ्यावयास हवा. हैदराबाद पोलिसांनी बलात्कार्यांविरुद्ध एन्काऊंटर सारखे जे कडक पाऊल उचलले तसे पाऊल प्रत्येक राज्यातील पोलिसांनी बलात्कारी नराधमांविरुद्ध उचलल्यास अशा लोकांवर वचक बसेल. असहाय्य महिला व युवतींवर अत्याचार करण्यापूर्वी ते दहावेळा विचार करतील.
पोलिसांनी महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात कडक पावले उचलल्यास महिला व युवती निर्धास्तपणे घराबाहेर पडू शकतील. आपल्या मुलींना शाळा-कॉलेज अथवा कामावर पाठविताना कोणत्याही पालकांना भीती वाटणार नाही. होय भारतात महिलांसाठी आम्हाला सुरक्षित वातावरण हवे आहे, अशा आशयाचा तपशील नॅशनल फेडरेशन ऑफ इंडियन वुमन कर्नाटक राज्य शाखेच्या प्रसिद्धीपत्रकात नमूद आहे.
प्रसिद्धी पत्रकावर संघटनेच्या राज्य सचिव कु. प्रमोदा हजारे, प्रिया पुरानी, निशा मोहन पाटील, सविता काटकर, सोनाली गवी, रेखा लाड, राधिका कृष्णा पाटील, रेणुका कोणू, शितल सुतार, रूपा बेळगावकर आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.