Saturday, April 27, 2024

/

हलाखीच्या परिस्थितीवर मात करून ‘ते’ बनले तहसीलदार

 belgaum

जिद्द आणि खडतर तपश्चर्या करण्याची तयारी असेल तर जीवनातील कोणतेही लक्ष साध्य करता येते हे जणू बसवन कुडचीच्या अनिल बडीगेर यांनी सिद्धच केले आहे. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत डीएड परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या अनिल कल्लाप्पा बडिगेर यांनी आता केपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन चक्क तहसीलदार ग्रेड 2 पदापर्यंत मजल मारली आहे.

सुतार काम करून गुजराण करणार्‍या अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेल्या अनिल बडीगेर यांना सुरुवातीपासूनच मोठ्या कष्टात शिक्षण घ्यावे लागले. बऱ्याचदा पैसे नसल्याने वीज बिल न भरल्याने पथदीपांच्या प्रकाशात बसून त्यांना अभ्यास करावा लागला. वडील कल्लाप्पा त्यांच्या उमेदीच्या काळात सुतारकाम करत होते. परंतु काही वर्षांपूर्वी ते अर्धांगवायूचा झटक्याने अंथरुणाला खिळल्यामुळे आईने घर सांभाळत शेतातील कामे सुरू केली. दरम्यानच्या काळात अनिल बडीगेर यांचे प्राथमिक शिक्षण बसवन कुडची सरकारी प्राथमिक शाळेत झाले.

Anil badiger
Anil badiger kpsc

घरची आर्थिक स्थिती बेताची असली तरी त्यांनी छोटी- मोठी कामे करून डीएड पूर्ण केले. त्यानंतर 2010 मध्ये अंजनेयनगर येथील शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावत असतानाच त्यांनी दूरशिक्षण अंतर्गत 2013 मध्ये कला शाखेची पदवी संपादन केली. या काळात त्यांनी आपल्या भावाच्या शिक्षणाची जबाबदारी देखील पेलली.

 belgaum

प्रशासकीय सेवेत विशेष रस असल्याने त्यांनी 2014 मध्ये पहिल्यांदा कर्नाटक लोकसखा लोकसेवा आयोगाची केपीएससी परीक्षा दिली. याकरिता त्यांनी बेंगलोर येथे प्रशिक्षण घेतले. तथापि दुर्देवाने केपीएससीच्या पूर्व परीक्षेत उत्तीर्ण होणारे बडीगेर मुख्य परीक्षेत मात्र अनुत्तीर्ण झाले. मात्र आपली जिद्द न सोडता त्यांनी अधिक एकाग्रतेने अभ्यासाची तयारी करून 2015 सालीची केपीएससी परीक्षा दिली. यावेळी मात्र ते पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेतही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. त्यानंतर गेल्या सप्टेंबर महिन्यात झालेल्या मुलाखतीप्रसंगी त्यांची तहसीलदार ग्रेट 2 पदी निवड करण्यात आली. सदर निवडीबद्दल सध्या अनिल बडिगेर यांचे बसवन कुडची आणि परिसरात अभिनंदन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.