वन खात्याच्या दुर्लक्षामुळे गेल्या तीन महिन्यापासून हेम्माडगा (ता. खानापूर) परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या एका वाघाने गावाजवळच दिवसाढवळ्या एका बैलाचा फडशा पाडला. काल शनिवारी घडलेल्या या घटनेमुळे सदर परिसरातील वाघाच्या दहशतीमध्ये अधिकच भर पडली आहे.
वाघाची शिकार झालेला बैल हेम्माडगा येथील शेतकरी रामा गावडा यांच्या मालकीचा होता. शनिवारी रामा गावडा हे नेहमीप्रमाणे जनावरांना चरण्यासाठी आपल्या शेताकडे घेऊन गेले होते. त्यावेळी वाघाने त्यांच्या बैलावर अचानक हल्ला करून त्याला जंगलात ओढून नेऊन फडशा पाडला. याबाबतची माहिती मिळतात सहाय्यक वनक्षेत्रपाल नंद्यापगोळ यांनी त्वरित आपल्या सहकार्यांसह घटनास्थळी जावून पंचनामा केला. तसेच गावडा यांना नुकसान भरपाई देण्यात येईल, असे आश्वासन दिले.
भीमगड अभयारण्यातील हेम्माडगा परिसरा गेल्या 3 महिन्यापासून दर दिवसाआड वाघाने पाळीव प्राण्यावर हल्ला करण्याचे सत्र सुरू आहे. परिणामी हेमाड ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत तसेच मनुष्या वरील हल्ल्याच्या भीतीने त्यांच्यासह आसपासच्या गावात घबराटीचे वातावरण पसरले आहे. वाघाने आत्तापर्यंत एकाच गावातील सुमारे 34 जनावरांचा फडशा पाडला आहे. यासंदर्भात तहसीलदार व वनखात्याला निवेदन देण्यात आले होते. मात्र वनखात्याने अद्यापपर्यंत कोणतेही ही उपाययोजना केली नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान संबंधित वाघ हा वयोवृद्ध झाल्यामुळेच तो जंगली श्वापदं ऐवजी पाळीव प्राण्यांवर हल्ला करत असावा असा वनखात्याचा कयास आहे. तसेच यापुढे त्याच्यावर पाळत ठेवली जाईल, असे भिमगड अभयारण्य प्रशासनाने सांगितले आहे.