बेळगावहून बाची गावाकडे जाणारा रस्ता अरगन तलावानजीक चढावाचा आणि वळणदार असून या ठिकाणी सातत्याने अपघात घडत असल्याने यासंदर्भात नागरिकांनी आज मंगळवारी बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डाला निवेदन सादर केले.
बेळगावहून बाची गावाकडे जाणारा रस्ता अरगन तलावानजीक चढावाचा आणि वळणदार असून याठिकाणी अनेक वर्षापासून सातत्याने अपघात घडत असतात. अलीकडच्या काळात या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने अपघातांचा धोकाही वाढला आहे. यापेक्षा महात्मा गांधींच्या पुतळ्यापासून ते हनुमाननगर क्रॉसपर्यंत थेट रस्ता तयार केल्यास या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांच्या दृष्टीने ते सोयीचे आणि सुरक्षित ठरणार आहे.
विशेष म्हणजे हनुमाननगर क्रॉस येथून हिंडलगा, वेंगुर्ला रोडपर्यंतचा रस्ता देखील आता दुतर्फा 3 फुटाने रुंद करण्यात आला आहे. हनुमाननगर क्रॉसपासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत थेट रस्ता करण्याचा प्रस्ताव तितका सोपा नसला तरी प्रत्यक्षात हा प्रस्ताव कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी देखील सोयीचा आहे. कारण कॅन्टोन्मेंट बोर्ड सध्याच्या रस्त्याशेजारील जागा नवीन रस्त्यासाठी देऊन सध्याच्या रस्त्याची जागा आरगन तलावासाठी वापरू शकते.
अरगन तलावासभोवती वॉकिंग ट्रॅक आहे. त्यामुळे सध्याच्या रस्त्याची जादा जागा मिळाल्यास बोर्डाला याठिकाणी आणखी काही उपक्रम राबवता येतील. तेंव्हा महात्मा गांधी पुतळ्यापासून ते हनुमाननगर क्रॉसपर्यंत थेट रस्ता करण्यासाठी कँटोनमेंट बोर्डाने सहकार्य करावे अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.