यंदाच्या 34 व्या दासाप्पा शानभाग ट्रस्ट 16 वर्षांखालील आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेचे अजिंक्यपद हेरवाडकर हायस्कूल संघाने पटकाविले. अवघ्या 10 धावांनी पराभूत होणाऱ्या सेंट झेवियर्स हायस्कूलच्या ऋषिकेश राजपूत याला सामनावीर पुरस्कार प्रदान करण्यात आला.
अटीतटीच्या रंगतदार अंतिम सामन्यात हेरवाडकर हायस्कूल संघाने संघाने 10 धावांनी विजय मिळवल्यामुळे झेव्हीयर्सला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. दोन्ही संघात तुल्यबळ आणि अनुभवी खेळाडू असल्याने अखेरपर्यंत विजेतेपदाचा मानकरी कोण ठरेल याचा अंदाज लावणे उपस्थित क्रिकेट शौकिनांना कठीण ठरले होते.
हेरवाडकरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. दमदार फलंदाजी करत संघाचा कणा असणाऱ्या सुजय सातेरी याने 63, केदार उसुलकर याने 38 तर आकाश कुलकर्णी याने 11 धावा काढल्या. परिणामी हेरवाडकर संघाला निर्धारित 25 षटकात 8 गडी गमावून 175 धावांचा डोंगर रचण्यात यश मिळाले.
झेव्हीयर्स कडून गोलंदाजी करताना ऋषिकेश रजपूत याने 3 गडी, तर तेजस सुतारने 3 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना झेव्हीयर्स संघाला निर्धारित 25 षटकात 8 गडी गमावून 165 धावा जमवित आल्या. झेव्हीयर्सच्या ऋषिकेश राजपूत याने सर्वाधिक 96 काढल्या. त्याचे शतक अवघ्या चार धावांनी हुकल्याने क्रिकेट शौकीनांत हळहळ व्यक्त होत होती मयूरेश याने 12 तर पृथ्वीराजने 21 धावा काढल्या.
उत्कृष्ट फलंदाजी आणि गोलंदाजीचे दर्शन घडविलेल्या झेव्हीयर्सच्या ऋषिकेश राजपूत याची सामनावीर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. हेरवाडकर संघाच्या सुदीप सातेरी याला उत्कृष्ट फलंदाज, झेव्हीयर्सच्या आशिष देसाई याला उत्कृष्ट गोलंदाज तर सामनावीर पुरस्कार पटकविणाऱ्या ऋषिकेश राजपूत यालाच ‘मॅन ऑफ द सिरीज, पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.