बापट गल्ली येथील मोबाईल दुकानदाराला अज्ञात व्यक्तींनी मारहाण केल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे.मोबाईल विक्री ,दुरुस्ती करणारा व्यापारी मूळचा राजस्थानी आहे.या घटनेबाबत खडेबाजार पोलिसात फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
अज्ञात व्यक्तीने मोबाईल दुरुस्त करायचा आहे असे सांगून दुकानात प्रवेश केला.नंतर व्यापाऱ्याला मारहाण केली.व्यापाऱ्याने आरडाओरडा करताच मारहाण करणाऱ्या व्यक्तीने पळ काढला.अज्ञात व्यक्तीने मारहाण केल्याच्या निषेधार्थ बापट गल्लीतील राजस्थानी व्यापाऱ्यांनी शुक्रवारी आपली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदवला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रकाशकुमार माळी (वय 30) असे मारहाणीत जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव असून तो मुळचा राजस्थानमधील राहणारा आहे. यासंबंधी त्याचा भाऊ पुराराम माळी याने खडेबाजार पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. 100 हून अधिक व्यापाऱ्यांनी शुक्रवारी दुपारपर्यंत पोलीस स्थानकासमोर ठाण मांडले होते.