पुढील 5 वर्षात सीमा प्रश्न सुटून बेळगाव महाराष्ट्रात आल्यास त्या बेळगावचे आमदारपद भूषवायला मला आवडेल, असे चंदगडचे नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील यांनी सूचित केले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती आणि समस्त बेळगावकर- सीमावासीयांच्यावतीने अनगोळ येथील आदर्श मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृहात आज शनिवारी आयोजित आपल्या सत्काराला उत्तर देताना आमदार राजेश पाटील बोलत होते. सीमा लढ्यात अनेकांनी प्राणाची आहुती दिली, अनेकांनी लाठ्या-काठ्या खाल्ल्या, तुरुंगवास भोगला हा सत्कार मी त्या सर्वांना समर्पित करतो. या सर्वांच्या लढण्याच्या ऊर्जेमुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्रेरणा मिळाली आहे. यापूर्वी सीमाप्रश्न न्यायालय, विधिमंडळ अथवा लोकसभेत महाराष्ट्राकडून म्हणावा तसा पाठपुरावा होत नव्हता. यासंदर्भात महाराष्ट्राच्या नेतृत्वाने दाखविलेल्या दिरंगाई ची जाणीव करून देण्यासाठी त्यावेळी माझे वडील कै. नरसिंगराव पाटील यांनी सीमावासियांना स्मरून आमदार पदाची शपथ घेतली होती. आता त्यांचा सुपुत्र म्हणून माझं कर्तव्य होतं की ज्या भागात मी मोठा झालो आणि ज्या व्यथा-वेदना मी माझ्या डोळ्यांनी पाहिल्या त्याची आठवण व जाणीव महाराष्ट्रातील तमाम राजकीय नेत्यांना करून द्यावी म्हणून तुमचं प्रतिनिधी या नात्याने मी विधिमंडळात ती शपथ घेतली. त्या शपथेमुळे महाराष्ट्राच्या दोन्ही सभागृहातील राज्यपाल समोरील संभाषणांमध्ये सीमाप्रश्नाचा अंतर्भाव होता. आता महाराष्ट्रात महा विकास आघाडीचे सरकार स्थापन होताच मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सीमाप्रश्नाला प्राधान्य दिले असून त्या अनुषंगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे, असे आमदार राजेश पाटील यांनी सांगितले.
सीमा चळवळीत आता नवी पिढी उतरत आहे ही अत्यंत समाधानाची बाब आहे. महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या स्वरूपात या चळवळीत नवीन चैतन्य व नवतरुणाई पहावयास मिळत आहे. येथील तरुणांनी भगव्याची शान व महाराष्ट्राची अस्मिता पुढे नेण्याचे जे कर्तव्य पार पाडण्यास सुरुवात केली आहे त्याला माझा सलाम, असे सांगून बेळगावातील शांती आणि सौहार्दता जातीय सलोखा कायम राखण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे त्यांनी सांगितले. सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात ठोस पुरावे सादर करण्यासाठी सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करूया, नेतेमंडळी मी मतभेद विसरून संघटित राहावे असे आवाहनही आमदार राजेश पाटील यांनी केले.
सायंकाळी समारंभस्थळी आगमन झालेल्या सत्कारमूर्ती चंदगडचे आमदार राजेश पाटील यांचे आदर्श मल्टीपर्पज सोसायटी सभागृहाच्या प्रवेशद्वारात म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके यांनी हस्तांदोलन करून स्वागत केले. सत्कार समारंभाच्या प्रारंभी उडपी पेजावर मठाचे मठाधीश विश्वेश्वरतीर्थ स्वामीजींना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर सत्कारमूर्ती चंदगडचे आमदार राजेश पाटील, महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, खानापूरचे माजी आमदार अरविंद पाटील, मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, समितीचे नेते प्रकाश मरगाळे आणि म.ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके व्यासपीठावर उपस्थित होते.
सदर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर आमदार राजेश पाटील व दीपक दळवी यांच्या हस्ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. यावेळी बेळगाव कारवार निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे! राजेश पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है! या घोषणा देण्यात आल्या. व्यासपीठावरील विराजमान मान्यवरांचे शुभम शेळके, धनंजय पाटील, विशाल गौंडाडकर, सुरेश कणबरकर व सिद्धाप्पा चौगुले यांनी गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. समारंभाचे प्रास्ताविक युवा समितीचे कार्याध्यक्ष धनंजय पाटील यांनी केले.
सत्कार मूर्ती चंदगड नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील यांच्या भाषणानंतर व्यासपीठावरील अन्य मान्यवरांची समयोचित भाषणे झाली.
समारंभात महाराष्ट्र एकीकरण युवा समिती बेळगावचे अध्यक्ष शुभम शेळके यांच्या हस्ते आमदार राजेश पाटील यांचा मानाचा भगवा फेटा बांधून तसेच शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. या समारंभाचे औचित्य साधून जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांच्यासह अन्य मराठी भाषिक लोकप्रतिनिधी आणि विविध संघ- संस्थांतर्फे आमदार राजेश पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सदर सत्कार समारंभास माजी महापौर गोविंदराव राऊत, माजी नगरसेवक नेताजी जाधव, राजेश हंगिरर्गेकर आदींसह म. ए. समिती आणि म. ए. युवा समितीचे अन्य पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, माजी नगरसेवक, समिती प्रेमी नागरिक, हितचिंतक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, आज सकाळपासून अनगोळ येथील आदर्श मल्टीपर्पज सोसायटीच्या सभागृह परिसरात कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्याचप्रमाणे अनगोळ परिसरातील पोलीस बंदोबस्तात देखील वाढ करण्यात आली होती. आमदार राजेश पाटील यांच्या आगमनापूर्वी समारंभाच्या ठिकाणी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांनी सध्या वातावरण ठीक नाही तेंव्हा कार्यक्रम पुढे ढकलता येईल तर पहा, अशी सूचना महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पदाधिकाऱ्यांना करून पाहिली. तेंव्हा युवा समितीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कार्यक्रम तर होणारच आणि आम्ही तो शांततेत पार पाडू अशी ग्वाही संबंधित अधिकाऱ्यांना दिली.