जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील मतमोजणी आर पी डी कॉलेजमध्ये सोमवारी होणार असून मतमोजणीसाठी आवश्यक ती तयारी पूर्ण झाली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ एस.बी.बोमनहळ्ळी यांनी दिली.
मतमोजणी केंद्रात जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी नोडल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होणार आहे.
सुरक्षा,पार्किंग,इंटरनेट सेवा,निवडणूक अधिकाऱ्यांचे दालन,उपहार आणि भोजन सेवा,माहिती केंद्र याची माहिती उपस्थित अधिकाऱ्याकडून जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी घेतली.वैद्यकीय सेवा,रुग्णवाहिका आणि अग्निशमन दल देखील मतदान केंद्रात असणार आहे.
जनतेला मतमोजणीची माहिती समजावी म्हणून ध्वनिवर्धकांची व्यवस्था करण्यात येणार आहे.प्रत्येक मतदारसंघासाठी चौदा टेबल मतमोजणीसाठी असणार असून मतदान संख्येप्रमाणे जास्तीतजास्त 21 मतमोजणीच्या फेऱ्या होतील.निवडणूक आयोगाच्या परवानगी नंतर निकाल जाहीर केला जाणार आहे.
मतमोजणी केंद्रात मोबाईल नेण्यास परवानगी नसून माध्यम प्रतिनिधींना मोबाईल नेण्यास परवानगी असून मतमोजणी सुरू असलेल्या ठिकाणी जाताना माध्यम प्रतिनिधींनी मोबाईल माध्यम केंद्रात ठेवणे आवश्यक असल्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी सांगितले.