देशभरातील कारागृहांचा दर्जा सुधारण्याचा प्रयत्न सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगाव हिंडलगा मध्यवर्ती कारागृह हायटेक करून कैद्यांना माहिती-तंत्रज्ञान कर्मचारी अर्थात आयटी एम्पलोयी बनविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी कारागृहात बीपीओ युनिट स्थापन करण्यात येणार असून कर्नाटक राज्यातील कारागृहांमध्ये सुरु केले जाणारे अशा प्रकारचे हे दुसरे व्यवसाय प्रक्रिया आऊटसोर्सिंग (बीपीओ) केंद्र असणार आहे.
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहाचे मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी ही माहिती दिली आहे. हिंडलगा कारागृहात बीपीओ युनिट उभारून निवडक कैद्यांना माहिती तंत्रज्ञान कर्मचारी बनविण्यासाठीची सर्व तयारी कारागृह प्रशासनाने केली आहे. व्यवसायिक सामाजिक जबाबदारी (सीएसआर) प्रकल्पांतर्गत संबंधित कैद्यांची आयटी प्रशिक्षणासाठी निवड होणार आहे.
बेंगलोर येथील माहिती व तंत्रज्ञान कंपनी माईंड ट्री कडून संबंधित कैद्यांची निवड केली जाऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.
बेंगलोर येथील मध्यवर्ती कारागृहातनंतर राज्यात अशाप्रकारे बीपीओ युनिट सुरू करणारे बेळगावचे हिंडलगा मध्यवर्ती कारागृह हे राज्यातील दुसरे कारागृह आहे.
या बीपीओ युनिटच्या संगणक कक्षात (कॉम्प्युटर लॅब) 30 ते 35 संगणक संच बसवले जाणार आहेत.
संगणकाची आवड असणारे तसेच त्याचे थोडे जरी ज्ञान असेल अशा कैद्यांची आयटी प्रशिक्षणासाठी निवड केली जाणार आहे. युनिटमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या कैद्यांना दरमहा 10 ते 15 हजार रुपये मासिक भत्ता दिला जाईल. हे माहिती तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण कारागृहातुन शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर संबंधित कैद्यांना त्यांचे भावी जीवन अधिक चांगल्या प्रकारे व्यतीत करण्यासाठी उपयोगी पडेल, असे कृष्णकुमार यांनी स्पष्ट केले.
सध्या हिंडलगा मध्यवर्ती कारागृह 800 कैदी शिक्षा भोगत असून त्यापैकी बरेच जण सुशिक्षित आहेत. यापैकी काही जणांच्या हातून अपघाताने किंवा अनावधानाने गुन्हा झाला आहे, तसेच कारागृहातुन शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर चांगले जीवन जगण्याची स्वप्ने जे कैदी पहात आहेत, अशा कैद्यांसाठी हे आयटी प्रशिक्षण एक सुवर्णसंधी आहे, असे कारागृह मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी सांगितले.
बेंगलोर मध्यवर्ती कारागृहातील बीपीओ युनिट ज्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापण करण्यात आले ते माईंड ट्री कंपनीचे सरव्यवस्थापक अब्राहम मोझेस यांच्याच मार्गदर्शनाखाली हिंडलगा कारागृहातील युनिटची उभारणी केली जाणार आहे.
माहिती तंत्रज्ञान केंद्र असल्याने या बीपीओ युनिटला कडक सुरक्षा व्यवस्था पुरवली जाणार आहे. तसेच याठिकाणी काम करणाऱ्या कैद्यांच्या कामावर प्रशिक्षकांची सतत बारीक नजर असेल. हे युनिट संबंधित कैद्यांमध्ये सकारात्मक बदल करण्यास मोठी मदत करेल, असा विश्वासही मुख्य अधीक्षक कृष्णकुमार यांनी व्यक्त केला आहे.