सालाबाद प्रमाणे बेळगुंदी येथील रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीच्यावतीने रविवार दिनांक 8 डिसेंबर रोजी 14 वे मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले आहे. मरगाई देवस्थान परिसर बेळगुंदी येथे ते चार सत्रात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक अॅड. निशा शिवूरकर या भूषविणार आहेत.
सदर संमेलनाच्या ग्रंथदिंडीला सकाळी 8 वाजता प्रारंभ होणार असून पहिल्या सत्रात ग्रंथदिंडी, उद्घाटन, मान्यवरांचा सत्कार आणि संमेलनाध्यक्षांचे भाषण हे कार्यक्रम होणार आहेत. संमेलनाचे उद्घाटक म्हणून बेळगाव ग्रामीणचे माजी आमदार संजय पाटील हे उपस्थित राहणार आहेत. तसेच संमेलनाच्या स्वागताध्यक्षा शकुंतला बोकडे या असणार आहेत. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात साहित्यातील स्त्री दर्शन या विषयावरील परिसंवाद होणार होणार आहे.
कोल्हापूरच्या डॉक्टर ज्योती जाधव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादांमध्ये तरुण भारत बेळगावच्या प्रतिनिधी मनीषा सुभेदार, सांगलीच्या प्रतिभा जगदाळे आणि प्रा. मनीषा पाटील यांचा सहभाग असणार आहे. तिसऱ्या सत्रात आरोग्य व जीवन साधना या विषयावर डॉ. सोनाली सरनोबत यांचे व्याख्यान होणार आहे, त्यानंतर चौथ्या सत्रात ज्योती म्हापसेकर लिखित मुलगी झाली हो हे सामाजिक पथनाट्य श्रमिक स्त्री मुक्ती संघटना मुंबई यांच्यातर्फे सादर केले जाणार आहे. या संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिक वैजनाथ महाजन सांगली, श्वेता परुळेकर मुंबई, राजा शिरगुप्पे आजरा- निपाणी आदी मान्यवर साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे औचित्य साधून पर्यावरणप्रेमी शिवाजी कागणीकर, गुणवंत विद्यार्थी विक्रम वाय. नाईक व शुभम रा पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
बेळगुंदीच्या रवळनाथ पंचक्रोशी साहित्य अकादमीने सदर 14व्या मराठी साहित्य संमेलनाची जय्यत तयारी केली आहे.
संमेलनासाठी मरगाई देवस्थान परिसरात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. संमेलन यशस्वी करण्यासाठी विविध कमिट्या स्थापन करण्यात आल्या असून संमेलनाच्या पूर्वतयारीवर शनिवारी सायंकाळी अखेरचा हात फिरविण्यात आला.चंदगडचे नवनिर्वाचित आमदार राजेश पाटील यांना देखील या साहित्य संमेलनाचे निमंत्रण देण्यात आले आहे.