Friday, December 27, 2024

/

बेळगाव नोंदणी कार्यालय सध्या वेटिंगवर

 belgaum

राज्यातील सर्वाधिक महसूल देणाऱ्या कार्यालयांपैकी एक असणारे बेळगावचे नोंदणी कार्यालय दिवसेंदिवस नागरिकांसाठी सोयीचे होण्याऐवजी मनस्तापाचे ठरू लागले आहे. सर्व्हर डाऊनमुळे गेल्या 5 – 6 दिवसात याठिकाणी एकही काम झाले नसल्यामुळे वेटिंगवर असलेल्या नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

बेळगावचे रजिस्ट्रार ऑफिस अर्थात नोंदणी कार्यालय हे राज्यातील सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या नोंदणी कार्यालयात पैकी एक आहे तथापि अलीकडच्या काळात हे कार्यालय विविध कारणास्तव सातत्याने चर्चेत येऊ लागले आहे या कार्यालयाची सर्व्हर डाऊनची समस्या तर आता सर्वश्रुत झाले आहे या ठिकाणचा सर्व्हर वरचेवर बंद पडत असतो त्यामुळे संगणकावर चालणारे नोंदणीचे काम ठप्प होते ज्याचा मनस्ताप याठिकाणी येणाऱ्या नागरिकांना होत असतो. या ठिकाणच्या नागरिकांच्या रांगा पाहिल्यानंतर हे नोंदणी कार्यालय आहे की वेटिंग रूम? असा प्रश्न पडतो. तासंतास रांगेत ताटकळत उभारल्यानंतर अचानक सर्व्हर डाऊन झाल्याचे जेंव्हा सांगण्यात येते तेंव्हा नागरिकांना सर्व्हरच्या नावे बोटे मोडत घरी परतावे लागते. कागदपत्रांची वेळेवर नोंदणी न झाल्यामुळे बऱ्याच जणांना नुकसानही सहन करावे लागते या ठिकाणचा सर्व्हर वारंवार कशा मुळे डाऊन होतो याचे निश्चित कारण अद्यापही समजू शकलेले नाही आश्चर्याची गोष्ट म्हणजे उत्तर कर्नाटकातील हुबळी गुलबर्गा आदी ठिकाणी असणाऱ्या नोंदणी कार्यालयातील सर्व्हर व्यवस्थित काम करत असताना बेळगावात मात्र अगदी शिकवल्या प्रमाणे ठराविक कालावधीनंतर सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत असते.या सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांना मात्र वेळेचा अपव्यय आणि मोठा त्रास सहन करावा लागतो.

बेळगाव नोंदणी कार्यालयात दोन प्रमुख नोंदणी अधिकारी असले तरी या दोघांमधून वारे ही जात नाही. सदर अधिकाऱ्यांमध्ये पैशाची कमाई तसेच अन्य गोष्टींवरून नेहमी शीतयुद्ध सुरू असते. हा प्रकार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या चांगलाच परिचयाचा आहे. सदर अधिकाऱ्यांमधील शीतयुद्धाचे पर्यवसान सर्व्हर डाऊन होण्यामध्ये होत नसेल ना? अशी शंका नागरिकांना येऊ लागली आहे.

सदर कार्यालयात अंतर्गत राजकारण मोठ्या प्रमाणात सुरू असते. येथील कामकाजात सातत्याने राजकीय हस्तक्षेप होत असतो. अडलेल्या नागरिकांची कामे करून देण्यासाठी आपले खिसे गरम करणाऱ्या एजंटांचा सुळसुळाटही या ठिकाणी पहावयास मिळत आहे असा आरोप होत आहे.

सध्या गेल्या शनिवारपासून सर्व्हर डाऊनमुळे नागरिकांची नोंदणी कार्यालयातील कामे होऊ शकलेली नाहीत. नागरिक दररोज या कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. संगणक व्यवस्था बंद असल्यामुळे बहुतांश नागरिकांचे अर्ज गेल्या पाच-सहा दिवसांपासून धूळ खात पडून आहेत. सदर प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत असून नोंदणी कार्यालयातील सर्व्हर चांगल्या प्रकारे कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अथवा याठिकाणी नवा सर्व्हर बसवावा अशी मागणी केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.