अनैतिक संबंधातून किंवा गरीबीमुळे जी नवजात बालके रस्त्यावर टाकली जातात त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी आता बेळगावच्या स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान केंद्रांनी पुढाकार घेतला आहे. या अनुषंगाने या केंद्रातर्फे बेळगाव रेल्वे स्थानकावर बसविण्यात येणाऱ्या पाळण्याचा उद्घाटन समारंभ बुधवार दि. 18 डिसेंबर रोजी सकाळी 9 वाजता होणार आहे.
सदर समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी उपस्थित राहणार आहेत.
अनैतिक संबंधातून किंवा गरीबीमुळे नुकतीच जन्मलेली नवजात बालकं रस्त्यावर टाकून देण्याचे प्रकार आपल्या समाजात सर्रास घडत असतात अशा दुर्देवी बालकांचे भवितव्य धोक्यात असते. काहीवेळा उघड्यावर टाकलेल्या अशा बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही घडतात. यासाठी केंद्रीय दत्तक आणि पुनर्वसन संस्था नवी दिल्ली (सीएआरए) तर्फे प्रत्येक रेल्वे स्थानकावर पाळणे ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे.
दत्तक मुले देण्यासाठीची सरकार मान्य अधिकृत संस्था म्हणून सुपरिचित असलेल्या श्री स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान केंद्राने बेळगावात ही जबाबदारी स्वीकारली आहे. आपली सामाजिक बांधिलकी जोपासताना या केंद्रातर्फे आता बुधवारपासून बेवारस नवजात बालकांसाठी बेळगाव रेल्वे स्थानकावर पाळणा कार्यरत होणार आहे.