सीमाभागातील मराठी भाषिकांवर सातत्याने सुरु असणारे अन्याय आणि त्याविरोधात सीमावासियांचा लढा हा मागील 63 वर्षापासून सुरू आहे. नुकतीच एका कन्नड गुंडांनी मराठी नेत्यांना गोळ्या घाला अशी मुक्ताफळे उधळली आहेत. त्यामुळे संपूर्ण सीमा भाग आणि महाराष्ट्र पेटून उठला आहे. यासंदर्भात खबरदारी म्हणून नुकतीच कन्नड नेत्यांची बैठक घेण्यात आली तर आता मंगळवारी दहा वाजता समिती नेत्यांचीही पोलिस आयुक्तांनी बैठक घेण्याचे सांगितले आहे.
मागील 63 वर्षापासून आपल्या न्यायहक्कासाठी येथील मराठी बांधव न्यायालयीन लढा देत आहेत. सध्या हा प्रश्न न्यायालयात आहे मात्र काही कन्नड कार्यकर्ते वळवळ करत असून त्यांना वेळीच चाप बसण्याची गरज निर्माण होत आहे. सध्या महाराष्ट्र आणि कर्नाटक पेटले असून या प्रश्नावर तोडगा हा न्यायालयात काढेल अशी आशा सीमाभागातील नागरिकांना आहे.
मंगळवारी सकाळी दहा वाजता पोलीस आयुक्त कार्यालयात मराठी नेत्यांची पोलीस अधिकाऱ्यां दोबत बैठक होणार आहे. या वेळी पोलीस आयुक्त बी एस लोकेश कुमार, उपायुक्त सीमा लाटकर यासह इतर ज्येष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ही बैठक घेण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिवसेनेचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रश्नाला दुजोरा देत हा प्रश्न लावून धरला आहे. त्यामुळे कन्नड वेदिके कडून वळवळ सुरू करण्यात आली आहे. याचा निषेध म्हणून कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बस सेवा ठप्प झाली होती. ती पूर्ववत झाली असली तरी ते सीमाभाग शांत व्हावा यासाठी पोलिस खात्याकडून ही बैठक घेण्यात येत आहे. त्यामुळे या बैठकीकडे सार्यांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.