एसकेई सोसायटीच्या अमृत महोत्सवी कार्यक्रमानिमित्त या संस्थेच्या जीएसएस महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र शाखेचे समृद्ध संग्रहालय सध्या चर्चेत येऊ लागले आहे. या पद्धतीचे महाविद्यालयात असणारे अशा प्रकारचे हे देशातील पहिलेच संग्रहालय आहे.
जीएसएस महाविद्यालयाच्या भूगर्भशास्त्र विभागाच्या अनोख्या भूशास्त्रीय संग्रहालयात भूगर्भातील विविध प्रकारचे खडक, खनिजे, जीवाश्म, शंख- शिंपले, प्रवाळ आदींचे सुमारे 1500 हून अधिक नमुने प्रदर्शनार्थ मांडण्यात आले आहेत. यामध्ये काही दुर्मिळ खडक, खनिजे, जीवाश्म, प्रवाळ वगैरेंचा समावेश आहे. हे सर्व काचेच्या शोकेस आणि कपाटांमध्ये व्यवस्थितरित्या नावासह मांडून ठेवण्यात आले आहेत.
चक्क साडेचारशे कोटी वर्षापूर्वीचा डायनासोर काळातील मगरीचा दात याठिकाणी पहावयास मिळतो. कॅट्स आय, जिओईड, मायका, समुद्राच्या तळाशी मिळणारा रॉक सॉल्ट आदी खडक कुतूहल वाढवितात. जिओईड हा मोठा लंब अंडाकृती दगड बाहेरून एखाद्या नारळाप्रमाणे दिसतो. तुळतुळीत काळसर वर्णाच्या या दगडाच्या गाभ्यात सिलिकॉन ऑक्साईड द्रवापासून बनलेले जांभळे चमकदार षटकोनी क्रिस्टल्स पहावयास मिळतात.
लाखो वर्षापूर्वीचे खडक, प्राणी, जलचर, पक्षी, कीटक यांचे जीवाश्म, खोल समुद्रातील प्रवाळ हे सर्व पाहताना थक्क व्हायला होतं. या स्वच्छ व टापटीप अशा संग्रहालयात फिरताना आपल्या ज्ञानात महत्त्वाची भर पडते हे निश्चित.
सदर भूशास्त्रीय संग्रहालयातील बरेचशे दुर्मिळ खडक, खनिजे, प्रवाळ, जीवाश्म हे पुण्याच्या एम. एफ. मक्की यांनी देणगीदाखल दिले आहेत,तर उर्वरित महाविद्यालयाच्या प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी अभ्यास दौऱ्यादरम्यान जमा केले आहेत, असे प्रा. सुरज मेणसे यांनी सांगितले.
सध्या डॉ. पी. टी. हनमगोंडा हे जीएसएस महाविद्यालयातील भूगर्भशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संग्रहालयाची देखभाल केली जाते.