तब्बल 3 वर्षे होत आली तरी बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकाच्या (सीबीटी) आधुनिकीकरणाचे काम अद्यापही रखडत सुरू असल्याने नागरिकांत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होताना दिसत आहेत.
बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचे (सीबीटी) भाग्य आहे हे की 2009 सालापासून करायचे करायचे म्हणून राहून गेलेल्या या बस स्थानकाच्या आधुनिकीकरणाच्या कामाचा 28 जानेवारी 2017 रोजी श्री गणेशा झाला.
सदर कामाला तर मोठ्या गाजावाजा करून प्रारंभ करण्यात आला. याचा राजकीय नेते मंडळींनीही आपली प्रतिमा उंचावण्यासाठी वापर करून घेतला. मात्र आता तब्बल 34 महिने म्हणजे दोन वर्षे दहा महिने होऊन गेले तरी मध्यवर्ती बसस्थानकाच्या आधुनिकीकरणाचे काम पूर्ण झालेले नाही. बाहेरून पाहता बस स्थानक आधुनिकीकरणाचे जवळपास 80 ते 85 टक्के काम पूर्ण झाल्याचे दिसून येते. खरेतर ठरल्याप्रमाणे जानेवारी 2019 मध्ये या बसस्थानकाचे आधुनिकीकरणाचे काम पूर्ण व्हावयास हवे होते. तसेच करारात सहा महिन्याचा जादा कालावधीही होता, तथापि आता तो देखील उलटून गेला आहे.

नियोजित आधुनिक बेळगाव मध्यवर्ती बस स्थानकाचा कोनशिला समारंभ 3 डिसेंबर 2016 रोजी झाल्यानंतर 2017 मध्ये प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मन्साराम विक्रम पवार (हर्षा कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड) यांच्याकडे बस स्थानक आधुनिकीकरणाचे काम सोपविण्यात आले आहे. या कामासाठी 32 कोटी 48 लाख 54हजार 759 रुपये खर्च निश्चित करण्यात आला आहे, तसेच 24 महिन्यात हे काम पूर्ण करण्याचे ठरले होते.
तथापि हा कालावधी उलटून गेला तरी अद्यापही बसस्थानकाचे आधुनिकीकरणाचे काम सुरूच असल्याने नागरिकांमध्ये सखेद आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान रखडत चाललेल्या आधुनिकीकरणाच्या या कामामुळे प्रवाशांना मात्र नाहक त्रास सहन करावा लागत आहे.