कनिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत सातत्याने घवघवीत यश मिळविणारी हलगा गावची सुपुत्री अक्षता बसवंत कामती हिचा बेंगलोर येथे राज्य ऑलम्पिक असोसिएशन अवार्ड देऊन सत्कार करण्यात आला.
बेंगलोर येथील कंठीरवा स्टेडियम येथे बुधवारी सदर सत्कार समारंभ पार पडला. यावेळी अक्षता कामती हिच्यासह कर्नाटकातील 18 प्रतिभावंत क्रीडापटूंना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
बेळगाव तालुक्यातील हलगा गावच्या अक्षता कामतीने यंदाच्या कनिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील 81 किलो वजनी गटात नवा विक्रम प्रस्थापित करत सुवर्णपदक पटकाविले. अक्षता हिने 32 व्या कनिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेतील 106 किलो वजन उचलण्याचा विक्रम मोडीत काढताना 120 किलो वजन उचलून नवा विक्रम प्रस्थापित केला.
कनिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत अक्षताने आतापर्यंत चार सुवर्ण व एक रौप्य पदक मिळविले आहे. तिची एकंदर कामगिरी लक्षात घेऊन येत्या जानेवारी महिन्यात गोहाटी आसाम येथे होणाऱ्या खेलो इंडिया साठी तिची निवड झाली आहे.
त्याचप्रमाणे फेब्रुवारी 2020 मध्ये कोलकत्ता येथे होणाऱ्या वरिष्ठ राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत देखील अक्षता कामती हिचा सहभाग असणार आहे. अक्षता ही बेंगलोर येथील साई स्पोर्ट्स इंडिया येथे वेटलिफ्टिंगचा सराव करते. तिला प्रशिक्षक सदानंद मालशेटी तसेच बेंगलोरच्या शामला शेट्टी, रणजीत व वीरपाल वीरपाल मॅडम यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अक्षता ही हलगा गावातील प्रतिष्ठित नागरिक बसवंत शिवाजी कामती यांची सुकन्या असून उपरोक्त यशाबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.