सरकारी कार्यालयांमध्ये एखाद्या कागदपत्रांसाठी सर्वसामान्यांची अडवणूक करून पैशाची लूट करण्याचे प्रकार सर्रास घडतात. मात्र याविरुद्ध आवाज उठविल्यास योग्य तो न्याय मिळतो याची प्रचिती शनिवारी जिल्हा रुग्णालयात आली, जेंव्हा अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी तब्बल 20 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या एका परीचारकाला तुरुंगाची तुरुंगाची हवा खावी लागली.
अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी 20 हजार रुपयांची लाच घेणाऱ्या उमेश मधुकर नेवगेरी या परिचारकास लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने शनिवारी सापळा रचून रंगेहात पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार भवानीनगर येथील चंद्रकांत गोपाळ चव्हाणथ यांचा नातू मंथन (वय दहा वर्षे) याला अपंगत्वाचे प्रमाणपत्र हवे होते.
चंद्रकांत यांनी त्यासाठी रितसर अर्जही केला होता. मात्र संबंधित प्रमाणपत्र देण्यासाठी टोलवाटोलवी केली जात होती. तेंव्हा जिल्हा रुग्णालयातील अपंग पुनर्वसन केंद्रातील परिचारक उमेश मधुकर नेवगेरी याने 20 हजार रुपयांच्या मोबदल्यात संबंधित प्रमाणपत्र पटकन मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
याबाबत चंद्रकांत चव्हाण यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला कळविताच एसीबीचे पोलीस अधीक्षक अमरनाथ रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी सापळा रचून उमेश नेवगेरी याला लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. सदर कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.