जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी सहकुटुंब बुडा कार्यालय आवारात मुक्काम ठोकल्याने हा एक चर्चेचा विषय झाला आहे.
शहर विकास प्राधिकरण अर्थात बुडाने आपल्या योजना क्रमांक 61 साठी कणबर्गी येथील 131 एकर जमीन ताब्यात घेतली आहे. सदर भूसंपादनाची प्रक्रिया गेल्या 13 वर्षापासून सुरू होती.
अखेर अलीकडेच संबंधित शेतकऱ्यांनी सदर 131 एकर जमीन बुडाच्या ताब्यात दिली. मात्र जमीन ताब्यात दिल्यानंतर ज्यांच्या जमिनींचे भूसंपादन झाले आहे, त्यापैकी कांही शेतकरी आता बुडा कार्यालय येथे जाऊन आंदोलन करत आहेत. या शेतकऱ्यांनी सहकुटुंब बुडा कार्यालयासमोर मुक्काम ठोकला आहे.
जमीन गेल्याने बुडा कार्यालयाखेरीज आपल्याला दुसरा आसरा नाही असे या शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. चुल वगैरे पेटवून या ठिकाणीच शेतकऱ्यांनी आपला संसार थाटला असून या मंडळींचे जेवणखाण बुडा कार्यालय आवारातच सुरू आहे.
बुडाची योजना क्रमांक 61 ही 160 एकर जमिनीत विस्तारली आहे. यापैकी 105 एकर मधील शेतकऱ्यांनी 50:50 टक्के वाटणीच्या आधारे भूसंपादनास परवानगी दिली आहे. याउलट उर्वरित शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे.