कोणतेही सरकारी कार्यालय व्यवस्थितपणे चालायचे म्हटल्यास त्या कार्यालयात काम करणाऱ्या अधिकारी वर्ग आणि कर्मचाऱ्यात समन्वय हवा लागतो. एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे असते. मात्र बेळगावातील सब रजिस्ट्रार कार्यालयात दोन अधिकाऱ्यांत समन्वय नसल्याने यंत्रणाच कोलमडताना दिसत आहे. गेल्या आठवड्यापासून या उपनोंदणी कार्यालयातला गोंधळ देखील संपता संपेना झाला आहे. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांतील वर कमाईचे शीत युद्धच जबाबदार आहे.
उप नोंदणी अधिकारी विष्णू तीर्थ आणि उप नोंदणी अधिकारी गिरीश चंद्र या दोघांतील अंतर्गत वाद आणि धुसफूसमुळे खरेदी पत्र गहाळ होणे, नवीन ऑपरेटर्स आल्या नंतर कार्यालयातील प्रिंटर्स एजंट कडून घेऊन जाणे असे प्रकार घडत आहेत, असा आरोप केला जात आहे. सध्या सब रजिस्ट्रार मध्ये गिरीश चंद्र समर्थक आणि विष्णू तीर्थ समर्थक असे ‘कर्मचारी आणि एजंटांचे’ दोन गट पडलेले आहेत. एका गटाकडे काम अधिक काम आल्यास दुसरा गट त्रास देण्याचा प्रयत्न करत असतो. अश्या अंतर्गत कुरघोड्या सुरूच आहेत त्यामुळे कागद पत्रे गहाळ होणे असे अनेक प्रकार घडत आहेत. कुणाचाच पायपोस कुणाच्या हातात नाही अशी अवस्था या कार्यालयाची झाली आहे.
सब रजिस्ट्रार विष्णुतीर्थ हे गेल्या कित्येक वर्षा पासून बेळगावात सेवा बजावत आहेत. तर गिरीश चंद्र हे अलीकडेच कार्यालयातील तांत्रिक बाबी दूर करण्यासाठी आले होते. शहरातील अनेक एजंटांचे आणि बदली झालेल्या ऑपरेटर्सचे एका अधिकाऱ्यांशी हित संबंध आहेत. तर एकाशी वितुष्ट आहे. जुन्या अधिकाऱ्यांत व नवीन अधिकाऱ्यात वरची कमाई विभागून जात असल्याने दोन्ही अधिकारी एकेमेकांची बदली करण्यासाठी लॉबिंग करत आहेत. अशी माहिती मिळत आहे. दोन अधिकाऱ्यांत रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे कामकाजात अनेक खटके उडत आहेत. याचा फटका नोंदणी करण्यासाठी आलेल्या सामान्य लोकांना बसत आहे. बेळगाव उपनोंदणी कार्यालय हे सरकारला अधिक महसूल देणारे कार्यालय आहे. या ठिकाणी वरील कमाई मालिद्या साठी दोन अधिकाऱ्यांत हा कलगीतुरा रंगल्याचा आरोप होत आहे. मात्र यात नोंदणीसाठी परंगावाहून आलेली जनता भरडत आहे.
तर दोन्ही अधिकाऱ्यांच्या बदल्या…
शनिवारी कार्यालयातील जुने प्रिंटर्स एजंटांनी घेऊन गेल्याने कामकाज ठप्प झालं होते. त्यावेळी भाजप नेते किरण जाधव यांनी सब रजिस्ट्रार कार्यालयात भेट देऊन समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले.दोन्ही अधिकारी जर अंतर्गत वाद करत असतील तर दोघांच्या देखील बदल्या करू असा भाजप पक्ष श्रेष्ठीनी इशारा दिल्याचे त्यांनी सांगितले. उत्तर आणि दक्षिण अशी कामाची विभागणी दोघांत करून द्या, अशी देखील मागणी केली जात आहे.