ग्रामीण भागातील रस्ते म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहेत. त्यामुळे या रस्त्याची पूर्णत वाताहात झाली असून विकास करण्याकडे साफ दुर्लक्ष होत आहे. सर्वसामान्य जनतेकडून विविध प्रकारचा कर घेतला जातो. मात्र या कराचा उपयोग विकासासाठी होतो का? असा सवाल उपस्थित करत जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. तातडीने रस्त्यांची कामे हाती घेऊन नागरिकांची सोय करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रस्त्यासाठी किती वेळा आंदोलन करायचे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी पंधरा दिवसांची मुदत घ्या जर पंधरा दिवसात रस्ते झाले नाहीत तर परिसरातील नागरिकांना घेऊन आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. एपीएमसी ते अलतगा क्रॉस तसेच हिंडलगा,मणुर, गोजगा आदी भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय झाली आहे. स्मार्ट सिटी मध्ये काही भाग आला असला तरी त्याही रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे रस्ते तातडीने करावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
एपीएमसी ते हांदिगणुर क्रॉस पर्यंत रस्त्यासाठी मागील दोन वर्षांपासून आंदोलने निवेदने देण्यात आली आहेत. मात्र या निवेदनाचा प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे का? त्याना निवेदनाची किंमत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. जर निवेदन देऊन आंदोलन करून देखील रस्ता होत नसेल तर प्रशासन विकासाची बोंब कशासाठी मारतो? असा प्रश्न उपस्थित करून पंधरा दिवसात रस्ते कामाला सुरुवात करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
अनेक रस्त्यांसाठी निधी मंजूर झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात रस्त्याना कधी सुरुवात होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तातडीने रस्ते कामाला सुरुवात करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील, गाव सुधारणा समितीचे अध्यक्ष आर आय पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश पाटील, एल आर मासेकर, ईश्वर गुरव, गुंडू गुंजीकर, सचिन बाळेकुंद्री, पितांबर पाटील, चेतक कांबळे, राजमंद्री आदी उपस्थित होते.