पूर्ववैमनस्यातून तलवार आणि कोयत्याने एका कामगाराचा खून करण्यात आला आहे. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. मुत्यानट्टी येथील यल्लाप्पा हलाप्पा गोरव वय 53 राहणार मुत्यानट्टी असे त्या खून झालेल्या दुर्दैवी कामगाराचे नाव आहे.
शुक्रवारी रात्री पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर बर्डे ढाब्याजवेळ सर्व्हिस रोडवर ही घटना घडली असून या प्रकरणी पाच जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा खून फिल्म स्टाइलने करण्यात आला असून त्याच्यावर तलवार व कोयत्याने वार करण्यात आला आहे. यामुळे तो जागीच कोसळला. खुनानंतर तब्बल एक ते दीड तास त्याचा मृतदेह सर्विस रोडवरच पडून होता. त्यानंतर काहींनी पाहून याची माहिती पोलिसांना दिली आहे.
यासंबंधी यल्लाप्पा याचा भाऊ सिद्धाप्पा गोरव यांनी काकती पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. संतोष सिद्धाप्पा केंप, सिद्धाप्पा यल्लाप्पा केंप, ईश्वर हलाप्पा हालभावी तिघेही राहणार मुत्यानट्टी, रवी बसू कुंबर्गी, विवेक नाईक दोघे राहणार कंग्राळी बिके या पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यांच्यावर भादवी 143 147 148 341 504 302 सहकलम 149 अन्वये एफआयआर दाखल करण्यात आला असून बेळगाव ग्रामीणचे एसीपी के शिवा रेड्डी पोलीस निरीक्षक श्रीशैल कौजलगी हे पुढील तपास करीत आहेत.
पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. शुक्रवारी रात्री यल्लापला खासगी इस्पितळात हलविण्यात आले. मात्र तेथे पोचण्याआधी त्याचा मृत्यू झाला होता. या प्रकारामुळे खळबळ माजली असून दहा वर्षानंतर यल्लापा व संशयित आरोपी यांच्यात भांडण झाले होते. तेव्हापासून दोन्ही कुटुंबीयांमध्ये हे वाद होता. याच पूर्ववैमनस्यातून त्याचा खून करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. खुनानंतर संशयित आरोपी फरारी झाले आहेत. या घटनेने एकच खळबळ माजली असून परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.