खानापूरच्या आमदार अंजली निंबाळकर यांनी बुधवारी तहसीलदार कार्यालयाला अचानक भेट देऊन बेजबाबदार आणि अकार्यक्षम तहसीलदार आणि अन्य कर्मचाऱ्यांची चांगली हजेरी घेतली.
तहसीलदार कार्यालयाला भेट दिल्यावेळी निंबाळकर यांना अनेक कामासाठी जनता तिष्ठत थांबल्याचे आढळून आले.तेथे कामानिमित्त आलेल्या जनतेशी संवाद साधल्यावर अनेकांची कामे प्रलंबित असल्याची माहिती मिळताच निंबाळकर चांगल्याच संतापल्या. एका विभागात तर एक महिला दीर्घ रजेवर गेल्यामुळे कामे प्रलंबित आहेत असे सरकारी पठडीतील उत्तर दिल्यावर उप तहसीलदार म्यागेरी यांची त्यांनी झाडाझडती घेतली.
सरकारी योजना,पेन्शन,ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सुविधा देण्याबाबत तत्परता दाखवली जात नसून जर कामासाठी जनतेला फेऱ्या मारायला लावला तर कारवाई केली जाईल असा इशारा आमदार निंबाळकर यांनी दिला.
या साऱ्या प्रकारावेळी तहसीलदार शिवानंद उल्लागड्डी हे हतबल होऊन सारवसारवी करण्याचा प्रयत्न करत होते.आमदार अंजली निंबाळकर यांच्या भेटीमुळे तहसील कार्यालयातील कर्मचारी आता तरी जनतेची कामे वेळेवर करतील अशी अपेक्षा जनता करत आहे.
कधी के एस आर टी सी बस चालक वाहक तर कधी नो एन्ट्रीत घुसणारा ट्रक चालक असे क्लास त्या घेतच आलेत.