कडोली येथे करण्यात आलेल्या रस्ता रुंदीकरण करून अनेकांचे संसार उघड्यावर टाकणाऱ्या प्रशासनाने तातडीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी तालुका पंचायत सदस्य उदय सिडदनांवर यांनी केली. यावेळी याबाबत ठरावी मंजूर करण्यात आला.
कडोली येथे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने व काही मोठ्या नेत्यांच्या वतीने रस्ता रुंदीकरणाचे काम घिसाडघाईने सुरू करण्यात आले. एक दिवस आधी नोटीस देऊन दुसऱ्या दिवशी कामाला सुरुवात करण्यात आली. मात्र अनेक संसार उघड्यावर आणून त्यांचे राखरांगोळी करणाऱ्या संबंधितांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने तातडीने त्यांना नुकसानभरपाई देऊन आर्थिक मदत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
नुकत्याच झालेल्या महापुरामध्ये अनेक घरे कोसळली आहेत तर काहींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तशा लोकांना तातडीने मदत करण्यासाठी सरकार सरसावले आहे. मात्र रस्ता रुंदीकरणासाठी आपली जागा देणाऱ्या घर मालकांना या नुकसानभरपाई पासून वंचित ठेवण्यात आले आहे. मागील वर्षभरापासून ही नुकसान भरपाई देण्यात न आल्याने अनेक जण संतापले आहेत.
काही नेत्यांनी टक्केवारी घेण्यासाठी घिसाडघाईने काम केले. आता या नागरिकांकडे पाठ फिरवली आहे. मात्र पुरामुळे त्यांच्या असलेल्या घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे त्यांनाही तातडीने नुकसानभरपाई देणे गरजेचे आहे. तेव्हा याबाबत ठराव तालुका पंचायत सभागृहात करून कडोली येथील घर पडलेल्या नागरिकांना तातडीने नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी यावेळी उदय सिद्धांतावर यांनी केली.