पावसामुळे घरांचे नुकसान झालेल्या सगळ्यांना सरकार कडून निश्चित मदत दिली जाईल.कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही कर्नाटकचे गृहनिर्माण आणि रेशीम खात्याचे मंत्री व्ही.सोमण्णा यांनी बेळगाव भेटीत दिली.
मुसळधार पावसाने घरे पडलेल्या पाटील गल्ली आणि पाटील मळा येथे त्यांनी भेट देऊन पाहणी केली.यावेळी पूर्ण घर कोसळलेल्या बाळकृष्ण वाघवडेकर यांना पाच लाख मदतीची कागदपत्रे सुपूर्द करून नव्या घराच्या उभारणीचे भूमिपूजन सोमण्णा यांनी केले.
यावेळी तेथून जाताना आमदार अनिल बेनके यांनी नुकसानग्रस्त घरे त्यांना दाखवली.त्यावेळी मंत्र्यानी नुकसान झालेल्या घरांचा अहवाल पाठवा कुणीही मदती पासून वंचित राहू नये अश्या पडक्या घरांचा सर्व्हे करून पाठवा अश्या सक्त सूचना जिल्हाधिकारी डॉ एस बी बोंमनहळळी यांना दिल्या.
उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी मंत्र्यांना गरिबांच्या घराची झालेल्या पडझडी बाबत कल्पना दिली त्यावेळी मंत्र्यांनी पाटील गल्लीत एकही नुकसान ग्रस्त घर मदतीपासून वंचित राहू नये याची काळजी घेण्याच्या सूचना दिल्या त्यामुळे या भागातील लोकांना अजूनही सर्व्हे करून नुकसानभरपाई मागता येणार आहे.यावेळी प्राथमिक स्वरूपात दहा घरांना नुकसानभरपाई पत्र वितरण करण्यात आले.