महापुरात अनेक घरे कोसळली आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येत आहे. मात्र हेस्कॉमच्या गलथान कारभाराचा फटका या पूरग्रस्त नागरिकांना बसत आहे. त्यामुळे विज जोडणी साठी भलीमोठी रक्कम नागरिकांना द्यावी लागत आहे. हेस्कॉमने आपले नियम शिथिल करून नागरिकांना सहकार्य करावे अन्यथा देण्यात येणारी नुकसानभरपाई ती वीज मंडळाच्या नावे करावी अशी मागणी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी केले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन त्यांनी ही मागणी केली आहे. महापुरामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक नागरिकांची घरे कोसळली आहेत. त्यांना नुकसानभरपाई देण्यात येत आहे. मात्र महापुरात वीज पुरवठा खंडित झाल्याने तो परत जोडून घेण्यासाठी भली मोठी रक्कम मोजावी लागत आहे. घरांचे वीज कनेक्शन खराब झाले आहे. त्यांना परत जोडून घेण्यासाठी अठरा हजार रुपये डिपॉझिट ठेवावे अशी अट वीज मंडळाकडून घालण्यात येत आहे. त्यामुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत.
जर तात्पुरता वीज कनेक्शन घेण्यासाठी मासिक बिल 24 ते 27 हजार रुपये पर्यंत आकारले जात आहे. यामुळे घर पूर्ण होईपर्यंत जवळपास तीस ते पस्तीस हजार रुपये हेस्कॉमला भरावे लागत आहेत. यामध्ये 18 हजार रुपये डिपॉझिट भरल्यास एकूण पन्नास हजार च्या घरात ही रक्कम जाते. त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात रक्कम भरावी लागत असेल तर मंजूर झालेल्या नुकसान भरपाई विज मंडळाच द्यावी असेही निवेदनात म्हटले आहे.
जिल्हाधिकार्यांनी याचा गंभीर विचार करून नागरिकांच्या हितासाठी तातडीने प्रयत्न करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत तातडीने संबंधिताना वीज दर कमी करून नागरिकांची सोय करावी अशा सूचना करण्यात येतील असे सांगितले.