काँग्रेस पक्षाने उपमुख्यमंत्री गोविंद कारजोळ यांच्यावर प्रचार करण्याला बंदी घालावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष दिनेश गुंडूराव यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अथणी येथे गोविंद कारजोळ हे पैसे वाटत असताना कॅमेऱ्यात कैद झाले असून अनेक वृत्त वाहिन्यांनी या बातमीचे प्रसारण केले आहे.त्यामुळे कारजोळ यांनी आचारसंहिता भंग केली आहे.त्यामुळे त्यांना पोट निवडणुकीच्या प्रचारात भाग घेण्यास बंदी घालावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे काँग्रेसने केली आहे.
व्हिडिओमध्ये कारजोळ पैसे वितरित करत असताना स्पष्ट दिसून येत आहे.तसेच ते माध्यमांना पैसे वाटायचे वगळून अन्य बातमी दाखवा असे सांगताना देखील व्हिडिओत दिसत आहेत.आमचा निबडणूक आयोगावर विश्वास आहे,त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे असे दिनेश गुंडूराव यांनी सांगितले आहे.
कागे यांना फटका बसण्याची शक्यता
कागवाड मतदार संघात बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार विवेक जयेंद्र शेट्टी यांनी काँग्रेसचे राजू कागे यांच्या समोर आव्हान उभे केले आहे.एकेकाळी कागे यांचे कट्टर समर्थक असलेल्या विवेक यांना जिल्हा पंचायत निवडणुकीत तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी कागे यांची साथ सोडली आणि तेव्हापासून कागे आणि शेट्टी यांच्यात वितुष्ट निर्माण झाले.
2017 मध्ये विवेक शेट्टी यांच्यावर हल्ला करण्यात आला होता.या प्रकरणी कागे सह तेरा जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.मारहाण प्रकरणाचा व्हीडिओ व्हायरल करून कागे यांना शेट्टी यांनी टार्गेट केले होते.आता शेट्टी यांनी प्रचार सुरू केला असून गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला मत देऊ नका असे आवाहन ते करत आहेत.तसेच बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार शेट्टी असल्यामुळे काँग्रेसच्या परंपरागत मतांची विभागणी होण्याची शक्यता असून त्याचा फटका राजू कागे यांना बसण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत देखील बहुजन वंचित आघाडीच्या उमेदवारामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले होते.