भावी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील होऊ महाराष्ट्र सरकार हे सीमावासीयांना दिलासा देणारं सरकार असेल अशी चर्चा असताना आमदारांच्या शपथविधी सोहळ्यावेळी बेळगावचा आवाज महाराष्ट्र विधानसभेत घुमला आहे.
चंदगडचे नवनिर्वाचित राष्ट्रवादीचे आमदार राजेश नरसिंगराव पाटील यांनी विधानसभेत बेळगावच्या सीमा बांधवाना स्मरूण आमदारकीची शपथ घेतली.संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनातील हुतात्म्यांचे स्मरण करून आणि बेळगाव,कारवार,निपाणी,बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी घोषणा राजेश पाटील यांनी शपथविधीपूर्वी देऊन साऱ्या सभागृहाचे लक्ष वेधून तर घेतलेच शिवाय सभागृहाला सीमाप्रश्नाच्या जबाबदारीचे स्मरणही करून दिले.

आमदार राजेश पाटील यांचे वडील नरसिंगराव पाटील देखील नेहमी सीमावसीयांच्या पाठीशी खंबीरपणे राहिले होते.मुंबईत जाणाऱ्या समितीच्या नेते मंडळींची मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांची भेट घडवून तर दिलीच शिवाय वेळोवेळी सीमाप्रश्नाचा पाठपुरावा देखील केला होता.आमदार राजेश पाटील यांनी देखील सीमाप्रश्नाच्या बाबतीत आपल्या वडिलांची भूमिका कायम ठेवली आहे.
शिवसेनेच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस,कॉंग्रेस सरकार बनवण्यात सिंहाचा वाटा उचललेले या सरकारचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांनी सरकारचे गठन करतानाच बेळगाव मुद्दा पुढे करत आम्ही सरकार स्थापन करत आहोत असं म्हटलं होतं.तिन्ही पक्ष बेळगाव प्रश्नी एक आहोत असं म्हटलं होतं त्यामुळं बेळगाव प्रश्नी हे सरकार आशादायी असेल यात शंका नाही.