कॅटोंनमेंट भागांत फिरणारी मोकाट जनावरे स्मार्टसिटी अंतर्गत बनवलेल्या बस स्थानकात मुक्काम ठोकून अस्वच्छता निर्माण करत आहेत . कॅम्प भागातील मोकाट जनावरांना शासनाने उभारलेल्या गो शाळेत पाठवा व शहर स्वच्छ ठेवण्यासाठी सहकार्य करा अशी सूचना उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी कॅटोंनमेंट बोर्डाला केली. शुक्रवारी सकाळी कॅटोंमेंट बोर्डाच्या मासिक बैठकीत ते बोलत होते.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी ब्रिगेडिअर गोविंद कलवड होते.महा पालिकेच्या क्षेत्रातील मोकाट जनावरें गोशाळेत सोडली जात आहेत कॅम्प भागातील जनावरांचा देखील बंदोबस्त करा अशी सूचना करताच ब्रिगेडिअर गोविंद कलवड यांनी छावणी सीमा परिषदेच्या वतीनं मोकाट जनावरांना पकडून गो शाळेत सोडू असे आश्वासन दिले.
फोर्ट रोड येथील सरकारी अड्डयाची मुदत संपली असून त्याचा ताबा कॅटोंनमेंट बोर्ड पुन्हा घेणार आहे.आगामी फेब्रुवारी महिन्यात नवीन बोर्ड निवडणूक होणार असल्याने डिसेंबरच्या आत तयारी करा असा आदेश संरक्षण खात्याने दिला आहे त्यानुसार प्रभाग पुनर्रचना आणि वार्ड आरक्षण संबंधी देखील बैठकीत चर्चा करण्यात आली.प्रभाग सात मध्ये 35 टक्क्यांहून अधिक अनुसूचित जाती जमातीचे लोक वास्तव्य करीत असल्याने तोच प्रभाग एस सी एस टी साठी रिजर्व ठेवण्याची सूचना सदस्यांनी केली.
गोगटे सर्कल गार्डनचा करणार विकास
बेळगाव शहरात असलेला मराठा रेजिमेंटचा बेस ध्यानात घेऊन गोगटे सर्कल जवळील गोगटे गार्डनच्या खुल्या जागेत नवीन सैनिक संग्रहालय उभा करून त्या जागी सैन्य दलातील रणगाडे ,तोफा यांचे संग्रहालय व उद्यान करण्यासाठी लष्कराने जुन्या तोफा ,रणगाडे देऊन सहकार्य करावे असे आवाहन आमदार बेनके यांनी केले असता ब्रिगेडिअर कलवड यांनी जागा व तोफा रणगाडे देण्याचे आश्वासन दिले त्यावर आमदारांनी आर्थिक मदत करू असे आश्वासन दिले. यावेळी आमदार व लष्करी अधिकाऱ्यांनी गोगटे सर्कल जवळील त्या खुल्या जागेची पहाणी देखील केली.