Wednesday, May 1, 2024

/

परशराम….

 belgaum

महाराष्ट्र एकीकरण समितीच्या बैठकीत परशराम क्वचितच दिसला असेल, किंबहुना नसावा.पण महात्मा फुले रोड शास्त्रीनगर भागात तो बुरुजासारखा उभा असायचा, पालिका असो किंवा आमदारकी असो परशराम दांडपट्टा घेऊन फिरणाऱ्या योद्धया सारखा आपल्या भागात फिरत राहायचा. त्याला गल्लीगल्लीत आपलं म्हणणाऱ्या लोकांची संख्या अमाप आहे. समितीच्या कार्यकर्त्या पुढे लाचारीचे तुकडे टाकून,अनेक राजकीय पक्षांनी कार्यकर्ते पळवले पण परशराम शहापूरकर याला कोणतेही प्रलोभन भुलवू शकले नाही!

भावकांना शहापुरकर या रविवार पेठ मधील नारळाच्या व्यापाराचा परशराम हा मुलगा, भलं दांडगे दुकान, अजस्त्र व्यापार सगळंकाही रेलचेल आणि भावकांनाचे अचानक जाणं. कोवळ्या वयाच्या परशराम वर सगळ्या व्यवहाराची जबाबदारी येऊन पडली.काळ माणसाला शिकवतो म्हणतात अल्पवधीतच परशरामने केवळ दुकान टिकवलंच नाही तर व्यवस्थित मार्गालाही लावलं.रविवार पेठेतील शहापुरकर यांचं दुकान म्हणजे मराठी माणसाचे मानबिंदू ठरलं.

अचानक हाताशी पैसे आले तर माणसं बिगडतात असे म्हणतात. खरं तर परशराम यांच्या हातात लहान वयातच कारभार आल्याने पैश्याची रेलचेल होती, पण हा परशराम बिघडला नाही तर अधिकच सजग झाला. व्यवहारात चतुर होताच,त्याच प्रमाणे माणसात माणुसकीने वागणारा होता.

 belgaum

Parashram shahapurkar

एस पी एम रोडवर साध्या भोळ्या लोकांचा एक ग्रुप आहे. बिनचेहऱ्याचा. त्यांचा परशराम म्होरक्या.. या सर्वांनी मिळून महात्मा फुले रोडवर गणेश उत्सव सुरू केला आणि प्रत्येकाला कार्यकर्ता म्हणून ओळख मिळाली. एस पी एम रोड वरील गणेश उत्सव दरवर्षी आगळा वेगळा होतो, बेळगावभर चर्चेत रहातो. स्थापने पासून परशरामच अध्यक्ष… अध्यक्ष बदलावं असं कुणाला वाटलंही नाही आणि पटलंही नाही. हे परशरामचे माणूस म्हणून यश आहे!

पायोनिअर बँकेतही अनेक वर्षे संचालक आणि उपाध्यक्ष म्हणून परशरामची कारकीर्द. आता तर विद्यमान अध्यक्षच परशराम. बँकेचे अध्यक्ष पद पदरी पडलं ते अधिकारानेच आणि त्याने या संधीचे सोने केले. बँकेत त्याचा धाक नाही तर लोभ आहे, त्याचा अनेक लोकांना लाभ आहे. त्याचा नाद माणसे जोडण्याचा, बँकेत लोकं पैसे जमा करतात त्याने माणसं जमा केली.

बेळगावच्या राजकारणाने कधीच वेगळं वळण घेतलं आहे राजकीय पक्षांनी समितीच्या भगव्यात वाटेकरी घातले आहेत. अनेक लोक समितीचा भगवा सोडून सत्तेतल्या पक्षात सामील झाले आहेत ,परंतु शास्त्रीनगर भागात परशराम नावाचा बुलंद बुरुज महात्मा फुले रोडवर अभेद्य उभा होता. आज हा बुरुज शांत झाला आहे. काळाने घात केला. पण या बुरुजाची जोडलेली माणसे त्याची स्मृती कधीही विसरू शकणार नाहीत …परशराम विना शास्त्रीनगर म्हणून ‘पाना विना झाडच…!’

-गुणवंत पाटील(साहित्यिक)

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.